कोल्हापूर : जिल्ह्याला पावसाने झोडपले
By Admin | Updated: October 8, 2014 00:29 IST2014-10-08T00:27:16+5:302014-10-08T00:29:57+5:30
खरीप पिकांचे मोठे नुकसान : कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळले

कोल्हापूर : जिल्ह्याला पावसाने झोडपले
कोल्हापूर : परतीच्या पावसाने आज, सायंकाळी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याला झोडपून काढले. धुवाधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तासभर शहरातील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली होती. पावसाच्या सरी इतक्या वेगात होत्या की, वाहनांना दोन फुटांवरील काही दिसत नव्हते. या पावसाने काढणीला आलेल्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अचानक झालेल्या मुसळधार वळीव पावसामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महार्गावरील वडणगे फाट्याजवळील झाड रस्त्यावर कोसळले. वाहतूक मार्गावर झाड पडल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर खोळंबली होती. स्थानिक नागरिक, वाहनधारक व करवीर पोलिसांनी कोसळलेले झाड बाजूला केल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
२७ सप्टेंबरला सूर्याने ‘हस्त’ नक्षत्रात प्रवेश केला आहे. या नक्षत्राचे वाहन ‘बेडूक’ असल्याने जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात होता. त्याप्रमाणे रोज जिल्ह्यात कुठे ना कुठे धुवाधार पाऊस सुरू आहे. सकाळपासून वातावरणात कमालीचा उष्मा जाणवतो, दुपारी तर अंगाची लाही-लाही होते. ‘आॅक्टोबर हिट’चा तडाखा दिवसभर नागरिकांना सहन करावा लागत आहे, पण सायंकाळी जोरदार पाऊस होत असल्याने हवेत गारवा जाणवतो. आज सायंकाळी सात वाजता कोल्हापूर शहरात जोरदार पाऊस झाला. तासभर झालेल्या धुवाधार पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. विजेच्या कडकडाटासह कोसळणाऱ्या सरींचा वेग इतका प्रचंड होता की, वाहनचालकांना दोन फुटांवरील दिसत नव्हते. शहरातील रस्त्यांवर सर्वत्र पाणीच पाणी पसरले होते. अनेक ठिकाणी सखल भागांतील गटर्समध्ये पाणी न बसल्याने रस्ते जलमय झाले होते.
ग्रामीण भागात सध्या सुगीचे दिवस सुरू झाले आहेत. भात, भुईमूग काढणीला आलेले आहेत. एक दिवस आडाने पाऊस ग्रामीण भागात सुरू असल्याने भातकापणी कशी
करायची, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काढणीला आलेले भात कापले नाही तर पावसाने ते भुईसपाट होत आहे. जमिनीवर भात पडल्याने चार दिवसांत त्याला मोड येण्यास सुरुवात होत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी भुईमूगाच्या शेंगांना मोड आलेत.