कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले
By Admin | Updated: May 6, 2015 00:41 IST2015-05-06T00:41:27+5:302015-05-06T00:41:38+5:30
वाहनधारकांची तारंबळ : कसबा बावड्यात भींत कोसळून तिघे जखमी; झाडे पडली; घरांची कौले उडाली, वीज गेल्याने काही काळ जिल्हा अंधारात

कोल्हापूर जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले
कोल्हापूर : जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. विजेच्या कडकडाट व वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने अचानक सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तारंबळ उडाली. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. तर घरांची कौले, पत्रे उडून गेल्याच्या घटना घडल्या.
कोल्हापूर शहरानगजीकच्या कसबा बावड्यात घराची भींत पडल्याने तिघेजण जखमी झाले. तर याच परिसरात पारायण सप्ताह कार्यक्रमसाठी उभारण्यात आलेला मंडप भुईसपाट झाला.
वादळी वाऱ्यामुळे वीज गेल्याने जिल्ह्याचा बहुतांशी भाग अंधारातच होता. शेतीसाठी हा पाऊस उपयुक्त असल्याचे मानले जाते.
संपूर्ण जिल्ह्याला पावसाने झोडपले असले तरी इचलकरंजी परिसरात मात्र पावसाने हुलकावणी दिली.
कसबा बावड्यात भिंत कोसळून तिघे जखमी, मंडप भुईसपाट
कसबा बावडा : सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आलेल्या मुसळधार पावसामुळे येथील आंबेडकरनगरातील विष्णू सुभाना कांबळे यांच्या घरावर भिंत कोसळली. यामध्ये तिघेजण जखमी झाले, तर कसबा बावडा पॅव्हेलियन मैदानावर ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहानिमित्त उभारण्यात आलेला मंडप जोरदार वारे व पावसामुळे भुईसपाट झाला.
सायंकाळी साडेसहा वाजता बावड्यात अचानक आकाश काळवंडून आले. पाठोपाठ जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसास सुरुवात झाली. यामुळे आंबेडकरनगर येथे भिंत कोसळली. अग्निशामक दलाने ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ढिगारा हलविण्यास सुरुवात केली. यामध्ये विष्णू कांबळे यांची पत्नी उषा कांबळे (वय ४७), सून सुप्रिया कांबळे (२२), नातू सोहम कांबळे (२) हे तिघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये हलविण्यात आले.
कसबा बावडा वारकरी सांप्रदाय व ग्रामस्थांच्या वतीने येथील पॅव्हेलियन मैदानावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. ६ ते १२ मे अखेर होणाऱ्या या कार्यक्रमासाठी सात हजार स्क्वेअर फुटाचा भव्य मंडप उभारण्यात आला होता, पण हा मंडप जोरदार वाऱ्यामुळे भुईसपाट झाला. यामध्ये मंडपाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. आता हा कार्यक्रम पॅव्हेलियन मैदानाजवळील हॉलमध्ये घेण्यात येणार आहे. याशिवाय दत्तमंदिर परिसरात बाळासाहेब गरड यांच्या घरावर झाड पडले. दुकानलाईनमधील अनेक दुकानात पावसाचे पाणी शिरले. व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.
गारगोटीत घरांची कौले उडाली
गारगोटी : भुदरगड तालुक्यात ठिकठिकाणी वादळी वाऱ्यासह प्रचंड मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने काही घराची कौले उडून जाऊन प्रचंड नुकसान झाले आहे.
सायंकाळी अचानकपणे सुरू झालेल्या पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
सायंकाळी वीज गायब झाल्याने अंधारातूनच शेतकरी, दुकानदार, बाजारला गेलेल्या मंडळींनी आपले घर गाठले. विजांच्या कडकडाडात पावसाने जोर धरला होता. मुसळधार पावसाच्या पाण्याने गावातील गटारी भरून वाहत होत्या.
जयसिंगपूरला पावसाने झोडपले
जयसिंगपूरसह परिसरात मंगळवारी सायंकाळी वळीव पावसाने झोडपले. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. गेल्या दोन दिवसांपासून हवेत प्रचंड उष्मा जाणवत होता.
दुपारनंतर ढगाळ वातावरण झाले होते. सायंकाळी सातच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात वळीव पावसास सुरुवात झाली. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता.