लसीकरणात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:17 IST2021-07-01T04:17:18+5:302021-07-01T04:17:18+5:30
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हानिहाय लसीकरणामध्ये कोल्हापूर अग्रस्थानी आहे. जिल्ह्यात आजवर १३ ...

लसीकरणात कोल्हापूर जिल्हा आघाडीवर
कोल्हापूर : कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात देशात महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे. जिल्हानिहाय लसीकरणामध्ये कोल्हापूर अग्रस्थानी आहे. जिल्ह्यात आजवर १३ लाख ३० हजार नागरिकांचे लसीकरण झाले असून, हे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे, असे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी सांगितले.
भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी मंगळवारी कोल्हापूर जिल्ह्याचे लसीकरण करण्यात तीनही मंत्री अपयशी ठरले आहेत, असा आरोप केला होता. पार्श्वभूमीवर बुधवारी मंत्री यड्रावकर यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, जिल्ह्यात ३० जूनपर्यंत एकूण १३ लाख ३० हजार २२६ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये ४५ वर्षांवरील ८ लाख ८२ हजार २४५ नागरिकांना पहिला डोस तर, २ लाख १५ हजार ६२० नागरिकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यात ४५ वर्षे व त्यावरील लाभार्थ्यांची अपेक्षित लोकसंख्या १२.७४ लाख आहे. पहिल्या व दुसऱ्या डोसचे एकूण १०.९८ लाख लसीकरण झाले असून, इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर प्रथम क्रमांकावर आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लसीकरण डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यासाठी यंत्रणा प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
---
वाया जाण्याचे प्रमाण उणे ०.७३ टक्के
लसीकरण वेगाने करत असतानाही लस वाया जाणार नाही याची देखील दक्षता यंत्रणेकडून घेतली जात आहे. कोविन पोर्टलवरील ३० जूनच्या अहवालानुसार जिल्ह्यात लस वाया जाण्याचे प्रमाण उणे ०.७३ टक्के इतके कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.