कोल्हापूर जिल्ह्यात कधी जोरदार, तर कधी रिपरिप
By Admin | Updated: September 1, 2014 23:04 IST2014-09-01T22:47:08+5:302014-09-01T23:04:03+5:30
जिल्ह्यातील धरणे भरण्याच्या मार्गावर : गणेशोत्सव मंडळांच्या तयारीत व्यत्यय

कोल्हापूर जिल्ह्यात कधी जोरदार, तर कधी रिपरिप
कोल्हापूर : जिल्ह्यात एका दमात पुरेसा पाऊस झाल्यानंतरही तो थांबण्याची अद्यापही काही लक्षणे दिसत नाहीत. सायंकाळनंतर जोरदार हजेरी लावणाऱ्या पावसाची दिवसभर रिपरिप सुरू असते. जिल्ह्यातील बहुतांशी धरणे आता भरण्याच्या मार्गावर आहेत. राधानगरी धरणाचे तीन दरवाजे उघडले असून, भोगावती व पंचगंगा नद्यांच्या पाण्याच्या पातळीत भर पडत आहे. सध्या गणेशोत्सवातील रंग वाढत असतानाच रिपरिप पाऊस पडत असल्याने गणेशोत्सव मंडळांतील कार्यकर्त्यांच्या तयारीवर मर्यादा येत आहेत.
गेल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती; परंतु गुरुवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला. दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळनंतर पावसाला सुरुवात होऊन रात्रभर तो सुरूच असतो. त्यामुळे विघ्नहर्त्या गणरायाचे आगमनही भरपावसात झाले. काल, रविवारी तर दिवसाही पाऊस पडत होता. आज, सोमवारी पावसाने थोडी उघडीप दिली. किरकोळ रिपरिप वगळता पावसाने आज विश्रांती घेतली होती; परंतु अधूनमधून होणाऱ्या पावसामुळे गणेशोत्सव मंडळांच्या तयारीवर मात्र मर्यादा पडत आहेत. यामुळे कार्यकर्त्यांची तारांबळ उडत आहे.
यावर्षी चांगला पाऊस झाला असल्याने जिल्ह्यातील राधानगरी, दूधगंगा, कडवी, वारणा, कुंभी, कासारी, जंगमहट्टी, घटप्रभा, कोदे, पाटगाव, तुळशी, चित्री, आदी धरणे जवळजवळ पूर्ण भरली आहेत. धरणक्षेत्रात आजही चांगला पाऊस होत आहे.
भोगावती नदीवर असलेल्या राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे आज उघडलेलेच होते. सकाळी स्वयंचलित दरवाजा क्रमांक ३ व ६ उघडा होता, तर दुपारी तीन वाजता दरवाजा क्रमांक ५ हाही उघडला गेला. या धरणावरील पॉवर हाऊसमधून दोन हजार, तर स्वयंचलित दरवाजातून १४०० असे मिळून ३४०० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदीच्या पाण्याची पातळीही काही प्रमाणात वाढली आहे. राजाराम बंधारा येथे पंचगंगा नदीची पातळी २८ फूट ४ इंच एवढी नोंदविली गेली. चोवीस तासांत दहा फुटाने ही पातळी वाढली आहे. राजाराम बंधाऱ्यावरील वाहतूक सध्या बंद आहे. (प्रतिनिधी)