कोल्हापूर : कधीकाळी अमक्याचा पाव्हणा, त्याचा कार्यकर्ता, तमक्याचा माणूस हे लेबल असले की काँग्रेसमध्ये पटकन पदाची माळ गळ्यात पडत होती. मात्र, आता त्याच काँग्रेसने वशिल्याची ही परंपरा खंडित करत निष्ठावंत आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना पदे देण्याचा निर्णय घेतला असून कोल्हापूर जिल्हा काँग्रेस कमिटीने निष्ठावंत आणि कार्यक्षम कार्यकर्त्यांना पक्षसंघटनेत संधी देण्यासाठी पाऊल उचलले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पक्षातील विविध पदांवर काम करण्यासाठी पदभरती जाहीर केली आहे. यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली असून ही समिती १ ऑगस्ट ते १२ ऑगस्ट या कालावधीत जिल्ह्यातील १२ तालुका अध्यक्ष आणि विविध सेलच्या प्रमुखांशी समन्वय साधून त्यानंतर इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहे. त्यानंतर काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील हे स्वत: १७ ऑगस्टला जिल्हा काँग्रेस कमिटीत इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत. यासाठी सचिव संजय पोवार-वाईकर व विजयानंद पोळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे.कोणत्या पदांसाठी कार्यकर्त्यांना मिळेल संधीमहिला, युवक, एनएसयूआय, अनुसूचित जाती विभाग, अल्पसंख्याक विभाग, इतर मागासवर्गीय विभाग, पर्यावरण विभाग, असंघटित कामगार विभाग, किसान व खेत मजदूर काँग्रेस, भटक्या जाती व विमुक्त जमाती, विधी मानव अधिकार, माहिती अधिकार, विज्ञान तंत्रज्ञान व कौशल्य विकास विभाग, सामाजिक न्याय विभाग, निराधार निराश्रित व्यक्ती विकास विभाग, उद्योग व वाणिज्य विभाग, डॉक्टर सेल, घरेलू कामगार सेल, अपंग विकास व मार्गदर्शक विभाग, सफाई कामगार सेल, सहकार सेल, रोजगार स्वयंरोजगार विभाग, सांस्कृतिक सेल लोक कलावंत विभाग.
कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते प्रत्येक गावात, वाड्यावस्तीवर कोणताही राजकीय लाभ न घेता काम करताना दिसतात. अनेक निष्ठावान आणि सक्षम कार्यकर्ते पक्षासाठी अहोरात्र झटत आहेत. त्यांना संघटनेत योग्य स्थान आणि जबाबदारी देणे हे आमचे कर्तव्य आहे. - आ. सतेज पाटील, जिल्हाध्यक्ष काँग्रेस, कोल्हापूर.