कोल्हापूर : केंद्र सरकारच्या अपात्र ११२ कोटी ८९ लाख कर्जमाफीतील थकीत रकमेवरील ६६ कोटी ६० लाख रुपये व्याज जिल्हा बँक भरणार आहे. बँकेचे अध्यक्ष व वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांच्या या निर्णयाने जिल्ह्यातील १३८१ विकास संस्थांच्या १४ हजार २९७ शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.केंद्र सरकारने २००८ मध्ये थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्जमाफी केली होती, पण लाभार्थीवरून तक्रार झाल्यानंतर नाबार्डने संपूर्ण कर्जमाफीची चौकशी केली. यामध्ये ४४ हजार ६५९ शेतकऱ्यांची ११२ कोटी ८९ लाखांची कर्जमाफी अपात्र ठरवली, तेव्हापासून जिल्हा बँक व विकास संस्थांची न्यायालयीन लढाई सुरू आहे. सध्या सर्वाेच्च न्यायालयात हे प्रकरण प्रलंबित असले, तरी बँकेच्या सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुश्रीफ यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे आश्वासन दिले. त्यानुसार थकीत ६६ कोटी ६० लाख रुपयांवरील व्याज माफ करण्याचा निर्णय घेतला.
शेतकऱ्यांची अडवणूक करू नका
अपात्र शेतकऱ्यांना दहा लाखांपर्यंत कर्जही मिळणार असून, अपात्रतेच्या मुद्द्यावरून कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक करू नये. त्याचबरोबर आतापासून त्याची वसुली व त्यावर रक्कमेवर व्याजही आकारता येणार नसल्याच्या सूचना विकास संस्थांना दिल्या आहेत.
दृष्टीक्षेपात अपात्र कर्जमाफी
- जिल्ह्याला मिळालेली कर्जमाफी - २७९ कोटी
- अपात्र कर्जमाफी - ११२ कोटी ८९ लाख
- अपात्र शेतकरी - ४४ हजार ६५९
- विकास संस्थांच्या पातळीवर वसुली - ४६ कोटी १७ लाख
- वसूल केलेले शेतकरी - ३० हजार ३६२
- थकबाकीदार शेतकरी - १४ हजार २९७
- थकीत व्याज रक्कम - ६६ कोटी ६० लाख
विकास संस्था अनिष्ट दुराव्यातून बाहेरविकास संस्थांकडून वसूल करुन घेतलेले व्याज ६६.६० कोटी तरतुदीतून संस्थांना परत मिळणार आहे. यामुळे संस्थांचा संचित तोटा कमी होऊन त्या अनिष्ट दुराव्यात बाहेर येणार आहेत.
परतफेड केलेल्या शेतकऱ्यांचे पैसेही देणारअपात्र कर्जमाफीचे प्रकरण सर्वेाच्च न्यायालयात प्रलंबीत असून, त्याचा निकाल लागल्यानंतर ज्यांनी कर्जमाफीची रक्कम परत केली, त्या ३० हजार २६२ शेतकऱ्यांना पैसे दिले जाणार आहेत. ज्यांनी थकबाकी भरणा केलेला नाही, अशा शेतकऱ्यांसाठी एकरकमी परतफेड योजना राबवणार असल्याचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी सांगितले.
अपात्र कर्जमाफीबाबत लवकरच सर्वोच्च न्यायालयात निकाल अपेक्षित आहे. पण, विकास संस्था आणि ते शेतकरी अडचणीत आले होते. त्यामुळे संचालक मंडळाने थकीत रकमेवरील व्याज देण्याचा निर्णय घेतला. - हसन मुश्रीफ अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक