कोल्हापूर : समाजसेवेचा आणि विधायक गणेशोत्सवाचा ध्यास घेऊन त्या दिशेने कार्य करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्षांशी साधलेला हा थेट संवाद..
By Admin | Updated: August 28, 2014 00:12 IST2014-08-27T23:41:18+5:302014-08-28T00:12:03+5:30
वैशिष्ट्य-उत्सवातून विधायकता-सामाजिक कार्यात योगदान-समाजप्रबोधनाचा वसा घेतलेले -नवसाला पावणारा देव---

कोल्हापूर : समाजसेवेचा आणि विधायक गणेशोत्सवाचा ध्यास घेऊन त्या दिशेने कार्य करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्षांशी साधलेला हा थेट संवाद..
कोल्हापूर -आपल्या आगमनाने समृद्धी सुख आणि आनंदाची पावले घेऊन येणाऱ्या गणेशाच्या आगमनासाठी करवीरनगरी सज्ज झाली आहे. लोकमान्य टिळकांनी स्वराज्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली. या गणेशोत्सवाच्या माध्यमातून कोल्हापुरातील विविध तरुण मंडळांनी समाजप्रबोधन, पर्यावरण रक्षण यांसह विविध सामाजिक कार्याचा आदर्श निर्माण केला आहे... या समाजसेवेचा आणि विधायक गणेशोत्सवाचा ध्यास घेऊन त्या दिशेने कार्य करणाऱ्या मंडळांच्या अध्यक्षांशी साधलेला हा थेट संवाद..
लक्षणीय देखावा हेच वैशिष्ट्य ---शाहूपुरीतील राधाकृष्ण मंडळ -अध्यक्ष : कपिल चव्हाण (राधाकृष्ण मंडळ, शाहूपुरी)
कोल्हापुरात अनेक गणेश मंडळे आहेत; मात्र आमच्या पाठीशी परिश्रमी, कल्पक आणि उत्साही कार्यकर्त्यांचे बळ आहे. समाजातील जे कोणी वंचित आहेत, त्यांना आपल्यापरीने काही तरी साहाय्य करायचे, त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करायचा आणि त्यांची जगण्याची उमेद वाढवायची ही मंडळाची मुख्य संकल्पना आहे. आमच्या मंडळात नाममात्र पदाधिकारी आहेत. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण एकच आहेत या विचारधारेतूनच मंडळाने आतापर्यंत वाटचाल केली आहे, असे मत ‘लोकमत’शी बोलताना राधाकृष्ण मंडळाचे अध्यक्ष कपिल चव्हाण यांनी व्यक्त केले.
चव्हाण म्हणाले, शाहूपुरी दुसरी गल्ली येथील १९८१ मध्ये स्थापन झालेल्या या मंडळाने पहिल्या वर्षापासून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. स्थापनेपासून आतापर्यंत एकाच आकारातील दगडूशेठ रूपातील मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते. अनेक जणांना भारतातील अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासाठी जाता येत नाही. त्यांना या वास्तू पाहता यावे या उद्देशाने आम्ही ऐतिहासिक वास्तूच्या प्रतिकृतीचे देखावे प्रतिवर्षी तयार करतो. दृकश्राव्य माध्यम आणि आकर्षक विद्युत रोषणाईमुळे येथील प्रतिकृती अत्यंत आकर्षक असतात. वर्गणीसाठी मंडळाचे एक किंवा दोनच कार्यकर्ते परिसरात फिरतात, तर अनेकजण स्वत:हून दरवर्षी वर्गणी देण्यासाठी येतात. पारंपरिक वाद्यांच्या गजरातच ‘श्री’ प्रतिष्ठापना केली जाते. गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवासापासूनच देखावा सुरू करण्याची परंपरा आम्ही आजही जपली आहे. चित्रपटातील गाणी अकरा दिवस न लावता भक्ती व भावगीते लावून गणेशोत्सवाचे धार्मिक पवित्र जपले जाते. अकरा दिवस पहाटे काकड आरती, त्यानंतर अभिषेक, सायंकाळी आरती, अकरा दिवस विविध धार्मिक विधी अशी कायमची परंपरा आहे. अनंत चतुर्थीला मुख्य मिरवणुकीत कधीच सहभाग न घेता पर्यायी मार्गाने गणेश मूर्तीचे विसर्जन मंडळातर्फे केले जाते. उत्कृष्ट देखाव्यांबरोबर वर्षभर अनेक सामाजिक उपक्रमही मंडळातर्फे केले जातात. अतिशय कमी खर्चातील, पण ज्यांचे सामाजिक मूल्य मात्र फार मोठे आहे अशा स्वरूपाचे हे उपक्रम यामध्ये असतात. गरजूंना शस्त्रक्रियेसाठी आर्थिक मदत, रक्तदान शिबिर, मंडळाच्या माध्यमातून एकत्र आलेले कार्यकर्ते समाजासाठी किती वेगवेगळ्या हेतूची कामे करू शकतात हे मंडळाच्या उपक्रमांमुळे सहजच लक्षात येते.
उत्सवातून विधायकता जपण्याची गरज : --ग्रामीण भागात ‘एक गाव, एक गणपती’ आणि शह-अनिल चौगुले (निसर्गमित्रचे कार्यवाह)
रामध्ये ‘एक प्रभाग-एकच गणपती’, विसर्जन पद्धतीत बदल, उत्सवाच्या दिवसांत ऊर्जेची बचत, आतषबाजीला नकार, डॉल्बी टाळणे, महाप्रसादाऐवजी गरजूंसाठी सरकारी रुग्णालयात अन्नछत्र उभारणे, अशा पद्धतीने गणेशोत्सव साजरा होणे उपयुक्त ठरणारे आहे. या उत्सवातून विधायकता जपण्याची गरज आहे, असे मत ‘निसर्गमित्र’चे कार्यवाह अनिल चौगुले यांनी व्यक्त केले.
चौगुले म्हणाले, कोल्हापूरची गणेशोत्सवाची परंपरा लोकप्रबोधन आणि कला जोपासण्याची तसेच सामाजिक बांधीलकी जपणारी आहे. कारण, कोल्हापुरात सार्वजनिक गणेशोत्सवात नाटक, मेळा, लेझीम, दांडपट्टा, हलगी, टाळमृदंग, आदी कलागुणांतून पूर्वी सादरीकरण होत होते. रंकाळा तलावातील निर्माल्य जमा करण्याचे कार्य १९८९ मध्ये सुरू झाले. त्यातून खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा कोल्हापुरात प्रारंभ झाला. या चळवळीमध्ये रंकाळा बचाव आणि संवर्धन संघटना, विज्ञान प्रबोधिनी, निसर्गमित्र, सेव्ह कोल्हापूर सिटीजन, जनस्वास्थ्य दक्षता समिती, अंनिस, ग्रीनगार्डस्, टीकनेचर क्लब, मुख्याध्यापक संघ, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभाग, शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र विभाग, राजेसंभाजी तरुण मंडळ, हिंदू युवा संघटना, चेतना विकास मंदिर, दीपक पोलादे, आदी सहभागी होतात. सुरुवातीच्या काळात नकारात्मकता होती. काही वर्षांनंतर कोल्हापूरकरांनी मनापासून ही चळवळ स्वीकारली आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे लक्ष्मीपुरीतील दहीहंडीच्या कार्यक्रमास गुटखा उत्पादक कंपनीचे प्रायोजकत्व होते. लोकसहभागातून कोल्हापूरकरांनी ही दहीहंडी बंद पाडली. त्यानंतरच्या काळात गणेशोत्सवात आणि इतर कोणत्याही उत्सवात सार्वजनिक मंडळांनी प्रायोजकत्व स्वीकारले नाही. व्यावसायिकता आणि राजकारणविरहित गणेशोत्सव साजरा करून लोकसहभागातून विधायक उपक्रम राबविणे. जमलेल्या वर्गणीतील काही भाग आरोग्य सुविधा उभारण्यासाठी खर्च करणे. वाचन संस्कृती वाढविण्याच्या दृष्टीने पुस्तकपेढी, वाचनालय उभा करणे. स्थानिक जैवविविधता टिकविण्यासाठी गणेशोत्सवात जनजागृतीसाठी उपक्रम राबविणे अशाप्रकारे सार्वजनिक तरुण मंडळांना, नागरिकांना गणेशोत्सवातून विधायकता जपता येणे शक्य आहे.
सामाजिक कार्यात योगदान --राजारामपुरीतील शिवाजी तरुण मंडळ-उपाध्यक्ष : नंदकुमार मगदूम (शिवाजी तरुण मंडळ, राजारामपुरी) राजारामपुरी दुसरी गल्ली येथील राजारामपुरी शिवाजी तरुण मंडळाने गेल्या ४३ वर्षांपासून विधायक गणेशोत्सवाची परंपरा सुरू ठेवली आहे. या मंडळाचे अध्यक्ष आहेत कुमार कोठावळे आणि उपाध्यक्ष आहेत नंदकुमार मगदूम. शासन, महापालिका, पोलीस प्रशासनाने घालून दिलेल्या सर्व नियम, अटींचे पालन करत मंडळाने सामाजिक कार्यात मोलाचे योगदान दिले आहे. डॉल्बीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात श्रींची मिरवणूक काढली जाते. रक्तदान शिबिर, शिवशक्ती तरुण मंडळाचे नियाज कडोले यांच्या कुटुंबीयांना मदत, महापुरात अडकलेल्या नागरिकांना मदतकार्य, भूकंपग्रस्तांना मदत, गरजूंना सहकार्य, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, तरुणांना स्वावलंबी बनविणे.. अशा अनेक विधायक कामांनी मंडळाने अन्य तरुण मंडळांसमोर आदर्श निर्माण केला आहे. या कार्यासाठी मंडळाला सेवा जल, पोलीस खात्याच्यावतीने पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. मंडळाचे जवळपास ३० हून अधिक कार्यकर्ते वर्षभर सामाजिक कार्यक्रमांसाठी राबत असतात.
नवसाला पावणारा देव---
संभाजीनगर तरुण मंडळ --अध्यक्ष : अजित सासणे (श्री छत्रपती संभाजी नगर तरुण मंडळ)---
श्री छत्रपती संभाजी नगर तरुण मंडळाचा गणपती म्हणजे कोल्हापुरातील मानाचा गणपती. पूर्णत: शाडूपासून बनविलेल्या या गणपतीची नवसाला पावणारा देव अशी ख्याती आहे. त्यामुळे गणेशोत्सव काळात या गणपतीला नारळाचे तोरण वाहण्याची पद्धत आहे. याकाळात तीन ट्रक नारळ जमा होतात. जवळपास ६० वर्षे पूर्ण केलेले हे मंडळ कोणत्याही भाविकाकडे वर्गणी मागत नाही. भूकंप निधी, पूरग्रस्त निधी, कारगिल निधी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द केला आहे. महापालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप, आरोग्य, पर्यावरण, व्यसनमुक्ती, साक्षरता अभियान, जलसंवर्धन, रक्तदान अशा विविध विषयांवर मंडळाने जनजागृती केली आहे. यासह चेतना विकास मंदिर, बालकल्याण संकुल या संस्थांना मदत, महिला सबलीकरणाचे विविध कार्यक्रम मंडळातर्फे घेतले जातात. या मंडळाने गेल्या दोन वर्षांत संभाजी नगर ते बालकल्याण संकुल या मार्गाच्या दुभाजकात वृक्षारोपण केले. या विधायक कार्यामुळे मंडळाला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.
समाजप्रबोधनाचा वसा घेतलेले -‘तुकाराम माळी तालीम मंडळ’-
अध्यक्ष : विनायक देसाई (तुकाराम माळी ताळीम मंडळ) ---
कोल्हापूरच्या गणेशोत्सवाची परंपरा समाजप्रबोधन आणि कलाकारांना मान देणारी व सामाजिक बांधीलकी जपणारी आहे. हा उत्सव आनंददायी व मंगलमय वातावरणात व्हावा, हा मुख्य उद्देश डोळ्यासमोर ठेवून यंदाही वृक्षसंवर्धनाच्या संदेशासह स्वामी विवेकानंद व रामकृष्ण परमहंस यांच्या विचारांवर आधारित सजीव देखावा सादर करून हा उत्सव आणखी आनंददायी व सुखकारक करणार असल्याची माहिती १३९ वर्षांची जुनी तुकाराम माळी तालीम मंडळाचे अध्यक्ष विनायक देसाई यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. देसाई म्हणाले, गणेशोत्सव म्हटले की, डॉल्बी लावून दंगामस्ती असा संबंध हल्लीच्या तरुणांनी लावला आहे. मात्र गणेशोत्सव म्हणजे मांगल्याचा, समाजातील चांगल्या गोष्टी आत्मसात करण्याचा व आपल्याकडे असलेला समृद्ध ठेवा जतन करण्यासाठी लोकमान्य टिळकांनी त्याकाळी योजून ठेवलेला आनंददायी सण आहे.
हा विचार करून १९७२ ला तुकाराम तालमीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग माने, रामभाऊ टिपुगडे, महादेव अतिग्रे, रवींद्र घोरपडे आदींनी समाजप्रबोधन व मिरवणुकीमध्ये अडथळा नको म्हणून छोट्या सव्वाफुटी गणेशाच्या मूर्तीची पालखीतून मिरवणुक काढण्याचा निर्णय घेतला. मिरवणुकीत समाजप्रबोधनाचे फलक लावले. हाच कित्ता आताच्या पिढीतील आम्हा कार्यकर्त्यांकडून गिरवला जात आहे. आतापर्यंत नेत्रदान, हुंडाबळी, रामराज्य, स्त्री-भू्रणहत्या, वृक्षांची तोड थांबवा आदी सजीव देखावे सादर करून समाज प्रबोधन केले आहे. ‘मानाचा पहिला गणपती’ म्हणून दरवर्षी अनंत चर्तुथीदिवशी पालखीतून, चालत मिरवणूक काढली जाते. दरवर्षी आरोग्यवर्धक औषधी वृक्षांची रोपे वाटली जातात. तसेच बहुउपयोगी वृक्षांची माहीती फलकाद्वारे यंदाही दिली जाणार आहे.