कोल्हापूरत दलित महासंघाची निदर्शने

By Admin | Updated: March 17, 2015 00:11 IST2015-03-16T22:46:22+5:302015-03-17T00:11:41+5:30

पानसरे हत्या प्रकरण : हल्लेखोरांना पकडा, पोलीस महानिरीक्षकांना निवेदन

Kolhapur Dalit Mahasangh's demonstrations | कोल्हापूरत दलित महासंघाची निदर्शने

कोल्हापूरत दलित महासंघाची निदर्शने

कोल्हापूर : ज्येष्ठ कामगार नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येला एक महिना उलटूनही पोलिसांना अद्यापही मारेकरी सापडलेले नाहीत. त्याच्या निषेधार्थ सोमवारी दलित महासंघाच्यावतीने विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढून निदर्शने करण्यात आली. यावेळी मारेकऱ्यांना त्वरित अटक करा, या मागणीचे निवेदन पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना देण्यात आले. पानसरे यांच्या हत्येनंतर मारेकऱ्यांना अटक करतो, तुम्ही आंदोलने करू नका, असे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी केल्याने सर्वच परिवर्तनवादी पक्ष, संघटनांनी संयम ठेवला. परंतु या घटनेला एक महिना उलटूनही पोलिसांनी मारेकऱ्यांना अटक केली नसल्याने ही बाब संतापजनक आणि एकूणच संशय बळावणारी आहे. या घटनेचा निषेध करत दलित महासंघाच्यावतीने सकाळी अकराच्या सुमारास विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली. त्यानंतर पोलीस महानिरीक्षक रितेशकुमार यांना निवेदन देण्यात आले.
देशात धर्मांध शक्तींच्या हातात सत्ता आहे. पानसरे हे या शक्तींच्या विरोधात लढा देत होते, तसेच या धर्मांध प्रवृत्तीची लबाडी पुराव्यांनिशी साध्या, सोप्या भाषेत सातत्याने मांडत होते तसेच अनेक परिवर्तनवादी चळवळीला ते मार्गदर्शन आणि पाठबळ देत होते. माजी पोलीस अधिकारी शमशुद्दीन मुश्रीफ यांच्या ‘हू किल्ड करकरे?’ या पुस्तकावरही परिसंवाद आयोजित केला होता. या सर्व प्रकरणातूनच त्यांची हत्या करण्यात आली आहे काय. या शक्यतांचा मागोवा घेऊन पोलिसांनी खुनी व त्याचा ‘मास्टर मार्इंड’चा शोध लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा तीव्र लढा उभारला जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष लालासाहेब नाईक, बाबासो दबडे, अनिल मिसाळ, सुरेश महापुरे, अभी अवघडे, आप्पासो कांबळे, निवास लोखंडे, सुनील कोळी, सुनील गस्ते, अमित कांबळे, विजय चौगले, पांडुरंग शिंगे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Kolhapur Dalit Mahasangh's demonstrations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.