शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २७ ला कोल्हापूर बंद : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची हाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:29 IST2021-09-17T04:29:58+5:302021-09-17T04:29:58+5:30

कोल्हापूर : शेतकरीविरोधी तीन शेती कायदे रद्द करावेत. वीज विधेयक मागे घ्यावे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के ...

Kolhapur closed on 27th for farmers' issues: call of Samyukta Shetkari Kamgar Morcha | शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २७ ला कोल्हापूर बंद : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची हाक

शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी २७ ला कोल्हापूर बंद : संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाची हाक

कोल्हापूर : शेतकरीविरोधी तीन शेती कायदे रद्द करावेत. वीज विधेयक मागे घ्यावे आणि शेतीमालाला उत्पादन खर्च अधिक ५० टक्के इतक्या रकमेचा हमीभाव देणारा केंद्रीय कायदा करावा या प्रमुख मागण्यांसाठी २७ सप्टेंबरला कोल्हापूर बंद करण्याचा निर्णय गुरुवारी येथे झाला. संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने भारत बंद पुकारण्यात आला आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय माजी आमदार संपतराव पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत झाला.

शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यालयात ही बैठक झाली. निमंत्रक पवार व नामदेव गावडे यांच्या वतीने बैठक बोलावण्यात आली होती.

निमंत्रक गावडे म्हणाले, मोदी सरकारने आपले जनताद्रोही धोरण पुढे चालू ठेवले आहे. पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस याचे दर रोज वाढवत सामान्य जनतेला जगणे महाग करून टाकले आहे. शेतकरीदेखील देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे ८ डिसेंबरप्रमाणेच हादेखील बंद कोल्हापुरात आपण कडक हरताळ पाळून यशस्वी करूया.

संपतराव पवार म्हणाले, कोल्हापूर बंदचे आंदोलन हे जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये, गावामध्ये, तसेच कोल्हापूर शहरामध्ये व्यापक पद्धतीने करणे गरजेचे आहे. त्यासाठी विभागवार मेळावे, व्यापाऱ्यांच्या बैठका, वाहतूकदारांच्या बैठका, तसेच सर्व दुकानदारांबरोबर संवाद साधूया. त्यांना आपली भूमिका पटवून देऊन शेतकरी जगला तरच देशाची उन्नती होऊ शकते हे पटवून देऊया. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला खरोखर पाठिंबा द्यायचा असेल, तर सर्व व्यवहार बंद ठेवण्याची विनंती करूया.

भाकपचे जिल्हा सचिव सतीशचंद्र कांबळे म्हणाले की, कोल्हापुरात त्या दिवशी सकाळी ११ वाजता बिंदू चौकात जमून मोटारसायकल रॅली काढून सर्व व्यापारी बंधूंना आणि कामगारांना या भारत बंदमध्ये एकत्र येण्याचे आवाहन करू.

या बैठकीस प्रा. जालंदर पाटील, चंद्रकांत यादव, दिलीप पवार, वसंतराव पाटील, रवी जाधव, अशोक जाधव, बाबूराव कदम, उदय नारकर, संभाजी जगदाळे, बाळू राऊ पाटील, वाय.एन. पाटील, अतुल दिघे, शाहीर सदाशिव निकम आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावे बंद करणार

सर्व गावांतील व तालुक्यांतील कार्यकर्त्यांनी आपापल्या भागातील व्यवहार बंद करून नंतर मग कोल्हापूर शहरातील बंदमध्ये सहभागी होण्यासाठी बिंदू चौकात जमण्याचे ठरले.

राष्ट्रवादीचाही पाठिंबा...

देशाच्या शेतकरीविरोधी नीतीच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या २७ तारखेच्या बंदला राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे नेते आर.के. पोवार यांनी ही माहिती दिली.

Web Title: Kolhapur closed on 27th for farmers' issues: call of Samyukta Shetkari Kamgar Morcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.