महामार्गाची उंची वाढल्यास कोल्हापूर शहराला पुराचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:22 IST2021-05-17T04:22:18+5:302021-05-17T04:22:18+5:30
सतीश पाटील शिरोली :- पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाला वेळी शिरोली ते पंचगंगा नदी पुलापर्यंत महामार्गाची सुमारे ८ ते ...

महामार्गाची उंची वाढल्यास कोल्हापूर शहराला पुराचा धोका
सतीश पाटील
शिरोली :- पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गाच्या सहापदरीकरणाला वेळी शिरोली ते पंचगंगा नदी पुलापर्यंत महामार्गाची सुमारे ८ ते १० फूट उंची वाढणार असून त्याचा फटका शिरोली, कसबा बावडा, कोल्हापूर शहर,शिये,भुये,या सह अनेक गावांना बसणार आहे.
सन २०१९ मध्ये कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पावसाचा आहाकार माजला होता. जवळपास १० दिवसांपेक्षा जास्त काळ कोल्हापूर जिल्हाला पुराच्या पाण्याचा वेढा बसला होता. तर सांगलीसुद्धा पाण्यात बुडालेली होती. ६ ऑगस्ट २०१९ रोजी पुणे बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर शिरोली सांगली फाटा येथे पुराचे पाणी आले. त्यामुळे बंगळूरकडे जाणारी आणि पुण्याच्या दिशेने जाणारी दोन्ही मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. महामार्गावर सुमारे आठ फूट उंच पाणी आले होते. २५ हजारहून अधिक वाहने या ठिकाणी पाणी उतरण्याच्या प्रतीक्षेत आठ दिवस वाट पाहत बसली होती.तर कश्मीर ते कन्याकुमारी पर्यंतचे सुमारे लाखो प्रवासी या महामार्गावर अडकले होते जवळपास आठव्या दिवशी महामार्गावरील वाहतूक सुरू झाली. या पुराच्या वेळी मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात शिरोलीत महामार्गावर येऊन प्रत्यक्ष परिस्थिती पाहून याठिकाणी सहापदरीकरणावेळी मोठा उड्डाणपूल उभा करू, असे आश्वासन दिले होते. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा प्रत्यक्षात पाहणी करून अहवाल पाठवला होता. मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः याठिकाणी मोठा उड्डाणपूल उभा करू असे आश्वासन दिले त्यामुळे भविष्यात आता महामार्गावर पाणी येणार नाही असे शिरोलीकरांना वाटले. पण सहापदरीकरणाचे काम करत असताना कन्सल्टंट नेमला असून या कन्सल्टंट ने याठिकाणी महामार्गावर चार फूट पाणी आले होते. आणि त्यापेक्षा अधिक पाच फुटांचे म्हणजे आठ ते दहा फुटांनी महामार्गावर भराव टाकून उंची वाढून घ्यायची असा प्रस्ताव तयार केला आहे. पण महामार्गावर किती पाणी होते याची कल्पना करून मगच याठिकाणी उड्डाणपूल उभा करणे गरजेचे आहे. महामार्गावर भराव टाकून उंची वाढवली तर पंचगंगा नदी किनाऱ्यावर असलेली सर्व गावे पाण्याखाली जातील.
कोट :- शिरोली सांगली फाटा येथे सन २०१९ महामार्गावर आठ ते दहा फुट पाणी आले होते.आठ दिवस महामार्ग बंद होता.मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्षात येऊन पहाणी केली होती. या महामार्गावर उड्डाणपूल उभा करू असे आश्वासन दिले होते. तसेच शिरोली ग्रामसंघाच्यावतीने सुद्धा याठिकाणी पिलरचा उड्डाणपूल उभा करावा अन्यथा शिरोली गावाला मोठा धोका निर्माण होईल. याठिकाणी उड्डाणपूल उभा केला नाही तर सहापदरीकरणाचे काम बंद पाडू. शशिकांत खवरे, सरपंच शिरोली.
कोट : महामार्गावर भराव नटाकता याठिकाणी पिलरचे उड्डाणपूल उभा करणे गरजेचे आहे.भराव टाकून उंची वाढवली तर शिरोलीगाव तर पाण्याखाली जाणारच पण पंचगंगा नदी किनारी असणाऱ्या गावांचे मोठे नुकसान होणार आहे.याठिकाणी उड्डाणपूल मंजूर झाले नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडणार. महेश चव्हाण -माजी जिल्हा परिषद सदस्य