कोल्हापूर ‘टेक आॅफ’ झाले पक्के
By Admin | Updated: September 1, 2014 00:29 IST2014-09-01T00:18:21+5:302014-09-01T00:29:09+5:30
डीजीसीए घेणार चाचणी : कोल्हापुरातील विमान सेवा सुरू होण्यासाठी मिळाली एनओसी

कोल्हापूर ‘टेक आॅफ’ झाले पक्के
कोल्हापूर : नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कोल्हापूरची विमान सेवा सुरू करण्यासाठीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) दिले आहे. त्यामुळे येथून विमान सेवा सुरू होण्याच्या दिशेने प्रयत्नांचे आणखीन एक पाऊल पुढे पडले आहे. येत्या दोन ते तीन आठवड्यांत नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून (डीजीसीए) कोल्हापुरातून विमान सेवा देण्यासाठी तयार झालेल्या मुंबईतील सुप्रिम एव्हिएशनच्या विमानाची चाचणी घेणार आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमान सेवा सुरू करण्यासाठी जूनमध्ये खासदार महाडिक यांनी पुढाकार घेतला. त्यांनी सुप्रिम एव्हिशन कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. शिवाय कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिकांशी चर्चा केली. ‘सुप्रिम’ने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी नियमित कमी आसन क्षमतेचे विमान सेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर १५ आॅगस्टला विमान सेवा सुरू करण्याचे निश्चित झाले. त्यानुसार कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी विमान सेवा पुरविण्यासाठी तयारी दर्शविलेल्या सुप्रिमने सेवा सुरू करण्यासाठी विविध प्रकारच्या तीस मंजुरी, परवानगी गेल्या महिन्यात मिळवल्या. राज्य शासनाच्या पातळीवरील प्रक्रिया पूर्ण केली. मात्र, नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून एनओसी मिळण्यास विलंब झाल्याने १५ आॅगस्टचा मुहूर्त लांबला. त्यानंतर खासदार धनंजय महाडिक आणि सुप्रिमच्या अधिकाऱ्यांनी एनओसीसाठी प्रयत्न सुरू ठेवले. आता नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून एनओसी मिळाल्यामुळे कोल्हापुरात विमान सेवा सुरू होणार हे पक्के झाले. (प्रतिनिधी)
चाचणी झाली की सेवा सुरू
कोल्हापुरातून विमान सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली अखेरची एनओसी मिळाली आहे. आता डीजीसीएकडून विमानाची चाचणी होण्याची प्रतीक्षा आहे. सुप्रिम सेवा पुरविण्यासाठी सज्ज आहे. त्यांनी आपले विमान बेंगलोरमध्ये पार्किंग केले आहे. चाचणीची प्रक्रिया पूर्ण झाली की, लगेचच विमान सेवा सुरू केली जाईल. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.