कोल्हापूरच्या पंचांना मिरजेत मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2016 08:34 IST2016-01-02T08:34:08+5:302016-01-02T08:34:46+5:30

फुटबॉल सामन्यावेळी घटना : पराभवामुळे मैदानाचा आखाडा

Kolhapur beat umpires in Miraj | कोल्हापूरच्या पंचांना मिरजेत मारहाण

कोल्हापूरच्या पंचांना मिरजेत मारहाण

मिरज : मिरजेत सुरू असलेल्या फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी रात्री मिरजेतील संघाचा पराभव झाल्यानंतर कोल्हापूरच्या पंचांना जमावाने मारहाण केली. त्यामुळे संतप्त पंचांनी बहिष्काराचा पवित्रा घेतल्यानंतर माफी मागून प्रकरण मिटविण्यात आले. मिरजेत फुटबॉल सामन्यात वारंवार मारामाऱ्या होत असल्याने मैदानाचा आखाडा बनला आहे.
मिरजेतील शिवाजी क्रीडांगणावर विद्युतझोतातील फुटबॉल स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धेत मुंबई, केरळ, हैदराबाद, अमरावती, हुबळी, बंगलोर, मिरजेसह १८ संघ सहभागी झाले आहेत. गुरुवारी रात्री मिरजेतील रेल्वे यंग बॉईज विरुद्ध मुंबई संघादरम्यान सामना झाला. या अटीतटीच्या सामन्यात प्रेक्षकांनी स्थानिक संघाला जोरदार प्रोत्साहन दिले. सामना संपण्यास पाच मिनिटे शिल्लक असताना मुंबईच्या खेळाडूस नियमबाह्य पद्धतीने अडविल्याच्या कारणावरून कोल्हापूरचे पंच अजिंक्य दळवी यांनी मुंबई संघास पेनल्टी किक बहाल केली. या संधीचा फायदा घेऊन मुंबई संघाने गोल नोंदवून १-० असा विजय मिळविला. मुंबई संघाच्या विजयामुळे मिरज संघाच्या समर्थकांनी सामना संपल्यानंतर पंच दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांना मैदानातच बेदम मारहाण केली.
यावेळी मध्यस्थीचा प्रयत्न करणारे जिल्हा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष जग्गू सय्यद यांनाही जमावाने धक्काबुक्की केली. या घटनेमुळे प्रेक्षकांचीही धावपळ झाली. मारहाणीच्या घटनेमुळे संतप्त झालेल्या पंचांनी स्पर्धेतील पुढील सामन्यांवर बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. मात्र, फुटबॉल संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून, मारहाण करणाऱ्यांना पंचांची माफी मागण्यास भाग पाडून, प्रकरण मिटविल्याची चर्चा होती.
दरम्यान, कोल्हापूरच्या पंचांनी मारहाणीच्या घटनेबाबत वेस्टर्न इंडिया फुटबॉल संघटनेकडे तक्रार केल्याची माहिती मिळाली. दोन दिवसांपूर्वी येथे प्रेक्षकांतही मारामारीचा प्रकार घडला होता. पोलीस बंदोबस्त नसल्याने मारामाऱ्या होत आहेत. (वार्ताहर)

वारंवार प्रकार
मिरजेत फुटबॉल स्पर्धेदरम्यान पंचांना, खेळाडूंना मारहाण, प्रेक्षकांत हाणामारीचे प्रकार वारंवार होत असल्याने, फुटबॉल क्रीडांगणाचा आखाडा झाला आहे. मारहाणीच्या घटनेबाबत पोलिसांत तक्रार नसल्याचे सांगण्यात आले. फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष वसंत अग्रवाल यांच्याशी संपर्क साधला असता, फुटबॉल स्पर्धेत असे किरकोळ प्रकार घडतात, असे त्यांनी सांगितले.

Web Title: Kolhapur beat umpires in Miraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.