कोल्हापूर :मिरवणुकीने अर्ज

By Admin | Updated: September 26, 2014 23:29 IST2014-09-26T23:17:59+5:302014-09-26T23:29:05+5:30

आवळेंसह १९ अर्ज हातकणंगलेतून दाखल

Kolhapur: Appeal application by procession | कोल्हापूर :मिरवणुकीने अर्ज

कोल्हापूर :मिरवणुकीने अर्ज

आर. के. पोवार यांनी भरला मिरवणुकीने अर्ज
कोल्हापूर : राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहराध्यक्ष आर. के. पोवार यांनी कोल्हापूर ‘उत्तर’मधून आज, शुक्रवारी उमेदवार अर्ज भरला. यावेळी  महापौर तृप्ती माळवी यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक उपस्थित होते.

स्थानिक गटबाजीचे प्रदर्शन : वैशाली क्षीरसागर यांचा डमी अर्ज
कोल्हापूर : शिवसेनेचे उमेदवार राजेश क्षीरसागर यांनी आज, शुक्रवारी शक्तिप्रदर्शन करीत ‘उत्तर’मधून उमेदवारी अर्ज भरला. मोठ्या संख्येने शिवसैनिक मिरवणुकीत सहभागी झाले असले तरी स्थानिक गटबाजीचे प्रदर्शनही यावेळी प्रकर्षाने जाणवले.
आमदार क्षीरसागर यांनाच यावेळी शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. आज, शुक्रवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पेटाळा येथून क्षीरसागर मिरवणुकीने उमेदवारी अर्ज भरण्यासाठी बाहेर पडले. मिरवणुकीत शिवसैनिक तसेच मोठ्या प्रमाणावर महिला कार्यकर्त्याही सहभागी झाल्या होत्या. पेटाळा मैदानावर झालेल्या सभेत क्षीरसागर यांनी उद्याची निवडणूक अस्तित्वाची लढाई असल्याने शिवसैनिकांनी मोठ्या ताकदीने कामाला लागावे, असे आवाहन केले. याप्रसंगी प्रा. विजय कुलकर्णी यांचेही भाषण झाले. यावेळी भाजपचे कार्यकर्ते किशोर घाडगे यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
रघुनाथ कांबळे यांचा मिरवणुकीने अर्ज दाखल
कोल्हापूर : ‘उत्तर’ मतदारसंघातून महाराष्ट्र डावी लोकशाही समितीचे उमेदवार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे रघुनाथ कांबळे यांनी आज, शुक्रवारी मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल केला. बिंदू चौकातील भाकपच्या कार्यालयापासून व्हीनस चौकापर्यंत कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. मिरवणुकीत ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे अग्रभागी होते. यावेळी लाल टोप्या परिधान केलेल्या कार्यकर्त्यांनी कांबळे यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या.
आवळेंसह १९ अर्ज हातकणंगलेतून दाखल
हातकणंगले : हातकणंगले मतदारसंघात आज, शुक्रवारी कॉँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, आरपीआय (आठवले गट) या प्रमुख राजकीय पक्षांसह अपक्षांनी शक्तिप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल केला. आज सहाव्या दिवशी नऊजणांनी १९ अर्ज दाखल केले.
हातकणंगले (राखीव) मतदारसंघात कॉँग्रेसचे जयवंतराव आवळे यांनी शक्तिप्रदर्शनाने रॅली काढून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांच्यासोबत राजू आवळे यांनी कॉँग्रेस व अपक्ष असे अर्ज दाखल केले.
सा.रे., यड्रावकर, मानेंसह दहा अर्ज दाखल
शिरोळ मतदारसंघ : आजअखेर ८७ उमेदवारांनी नेले १२२ उमेदवारी अर्ज
शिरोळ : शिरोळ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज, शुक्रवारी सहाव्या दिवशी दहाजणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यात कॉँग्रेसचे आमदार डॉ. सा. रे. पाटील, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीपराव पाटील, जिल्हा बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने, जि.प.चे बांधकाम सभापती अनिल मादनाईक, आदींचा समावेश आहे.
दरम्यान, आज निवडणूक विभागातून २१ उमेदवारांनी २७ उमेदवारी अर्ज नेले आहेत, तर आजअखेर ८७ उमेदवारांनी १२२ उमेदवारी अर्ज घेतले आहेत. तसेच एकूण १४ उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहेत. अर्ज नेणाऱ्यांमध्ये जयसिंगपूरच्या माजी नगराध्यक्षा स्वरूपा पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे.
या मतदारसंघातील निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांची संख्या वाढू लागली आहे. कॉँग्रेसचे आ. डॉ. आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील, राष्ट्रवादीचे उमेदवार आणि शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष
डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर,
जि.प. सदस्य धैर्यशील माने, ‘स्वाभिमानी’चे जि. प. चे बांधकाम सभापती अनिल मादनाईक,
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीपराव पाटील, दलितमित्र डॉ. अशोकराव माने, दलित सेनेचे सुनील कुरुंदवाडे, मनसेचे विजय भोजे, नवजीवन सेनेचे शिवाजी जाधव या उमेदवारांनी समर्थक कार्यकर्त्यांसमवेत आज आपले उमेदवारी अर्ज दाखल केले.
 

Web Title: Kolhapur: Appeal application by procession

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.