‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’कडून कोल्हापूर विमानतळाचा सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:28 IST2021-08-21T04:28:02+5:302021-08-21T04:28:02+5:30
कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत प्रवाशांची सुरक्षा आणि योग्य काळजी घेण्याच्या कामगिरीबद्दल लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने ...

‘वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड’कडून कोल्हापूर विमानतळाचा सन्मान
कोल्हापूर : कोरोनाच्या कालावधीत प्रवाशांची सुरक्षा आणि योग्य काळजी घेण्याच्या कामगिरीबद्दल लंडनमधील वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थेने कोल्हापूर विमानतळाला विशेष प्रशस्तीपत्राने सन्मानित केले. त्यामुळे कोल्हापूरचा जागतिक पातळीवर नावलौकिक झाला आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत आवश्यक ती दक्षता घेऊन कोल्हापूरची विमानसेवा सुरू राहिली. येथील विमानतळ प्रशासनाने सॅनिटायझर आणि मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग या कोरोनाबाबतच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. विमानतळावर येणाऱ्या आणि तेथून अन्य शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी याठिकाणी करण्यात येत होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या नियमानुसार विमानतळावर प्रवाशांची सुरक्षा, काळजी घेतल्याबद्दल वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड संस्थेने कोल्हापूर विमानतळाला विशेष प्रशस्तीपत्राने सन्मानित केले. त्याबाबतचे प्रशस्तीपत्र या संस्थेचे युरोप आणि स्वित्झर्लंड विभागाचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विमानतळाचे संचालक कमल कटारिया यांना गुरूवारी पाठवले आहे. या संस्थेने जुलैच्या पहिल्या आठवड्यात या प्रशस्तीपत्राबाबत जगभरातील विमानतळांकडून प्रवेशिका मागवल्या होत्या. त्यानुसार कोल्हापूर विमानतळाने कोरोनाकाळातील कामगिरीची माहिती देणारी प्रवेशिका सादर केली होती, अशी माहिती कटारिया यांनी दिली.
प्रतिक्रिया
कोरोनाच्या कालावधीत आम्ही केलेल्या कामगिरीची लंडनमधील संस्थेने या पुरस्काराच्या माध्यमातून दखल घेतल्याचा खूप आनंद होत आहे. या पुरस्काराचे श्रेय विमानतळावरील अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आहे. कोरोना काळात सेवा सुरू ठेवण्यास जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी, प्रवाशांचे मोठे सहकार्य लाभले. आमच्या विमानतळाला गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा पुरस्कार मिळाला आहे.
- कमल कटारिया, संचालक, कोल्हापूर विमानतळ