कोल्हापूर : विमानसेवा अजूनही ‘हवेत’च

By Admin | Updated: November 12, 2014 00:17 IST2014-11-12T00:10:23+5:302014-11-12T00:17:32+5:30

नुसताच ताकतुंबा : ‘डीजीसीए’ चाचणी होणार कधी ?

Kolhapur: The airline is still in the air | कोल्हापूर : विमानसेवा अजूनही ‘हवेत’च

कोल्हापूर : विमानसेवा अजूनही ‘हवेत’च

कोल्हापूर : लोकप्रतिनिधींचा पुढाकार, उद्योजक-व्यावसायिकांची तयारी, राज्य शासनाकडील पूर्ण झालेली प्रक्रिया, पर्यावरण, सुरक्षा आदी स्वरुपांतील आवश्यक असलेली ‘ना हरकत प्रमाणपत्र’ (एनओसी) मिळून दोन महिने उलटले, तरी कोल्हापूरच्या विमानसेवेचा प्रारंभ अजूनही ‘हवेत’च आहे.
गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी जूनमध्ये खासदार धनंजय महाडिक यांनी पुढाकार घेत मुंबईतील सुप्रीम एव्हिएशन कंपनीचे अधिकारी आणि कोल्हापुरातील उद्योजक, व्यावसायिकांची बैठक घेतली. त्यात ‘सुप्रीम’ने कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर अशी नियमित, कमी आसन क्षमतेची विमानसेवा सुरू करण्याची तयारी दर्शविली. त्यानंतर १५ आॅगस्टला विमानसेवा सुरू करण्याचा मुहूर्त निश्चित केला. त्यानुसार ‘सुप्रीम’ने सेवा देण्यासाठीच्या विविध प्रकारच्या तीस मंजुरी, परवानगी आॅगस्ट अखेरपर्यंत मिळविल्या तसेच राज्य शासनाच्या पातळीवरील सर्व प्रक्रियाही पूर्ण केली. मात्र, नागरी हवाई वाहतूक संचालनालयाकडून ‘एनओसी’ मिळण्यास विलंब झाल्याने विमानसेवा प्रारंभ लांबणीवर पडला. खासदार महाडिक आणि ‘सुप्रीम’च्या अधिकाऱ्यांनी तत्परतेने हालचाली करून विविध ‘एनओसी’ मिळविल्या. मात्र, विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या तीस मंजुरी, परवानगी आणि एनओसी मिळविल्यानंतर केवळ ‘डीजीसीए’च्या चाचणी घेण्याच्या प्रक्रियेत कोल्हापूरची विमानसेवा अडकून पडली आहे. (प्रतिनिधी)


‘डीजीसीए’च्या चाचणीबाबत केंद्रीयमंत्री गजपती राजू यांची या आठवड्यात दिल्लीला गेल्यानंतर भेट झाली नाही. २० नोव्हेंबरनंतर पुन्हा त्यांच्या भेटीसाठी जाणार असून याबाबत त्यांच्याशी चर्चा करणार आहे. विमानसेवा सुरू करण्याच्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
- धनंजय महाडिक, खासदार

‘जेट एअरवेज’कडून चाचपणी!
देशभरात विमानसेवा पुरविणाऱ्या ‘जेट एअरवेज’कडून कोल्हापूरमध्ये विमानसेवा पुरविण्याबाबतची चाचपणी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात संबंधित कंपनी कोल्हापूरचे ‘पोटेनशियल’ तसेच उद्योजक-व्यावसायिकांना किती तिकीट दर, विमानाची वेळ कशी असावी याबाबतची माहिती संकलित करत आहे. त्यासाठी कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, गोशिमा, स्मॅक आदी उद्योजकीय संघटनांची पत्रे घेतली जात आहेत.

‘ओनरशिप’
मध्ये अडकली चाचणी?
‘डीजीसीए’कडून एनओसी मिळाल्यानंतर कोल्हापूरची विमानसेवा सुरू होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, कंपनीच्या माध्यमातून सेवा पुरविण्यात येत असतील, तरच ‘डीजीसीए’ अशा स्वरूपातील चाचणीची प्रक्रिया पूर्ण करते. सध्या कोल्हापुरातून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नात असलेले एव्हिएशन ही ‘ओनरशीप’ पद्धतीतील असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे कदाचित ‘डीजीसीए’च्या चाचणीला विलंब होत असल्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

हे अडथळे दूर व्हावेत
विमानतळावरील ‘नेव्हिगेशन गेज’ तयार नाहीत. कारपेट एरिया योग्य स्वरूपातील नाही. कंपन्यांना अपेक्षित असल्याप्रमाणे रन-वे तयार नाही. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका सुविधा थकबाकीमुळे कोल्हापूर महानगरपालिका देण्यास तयार नाही. अशा स्वरूपातील अडथळे दूर होणे विमानसेवेच्या लवकर प्रारंभ होण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत.

विमानतळाची वाटचाल

१९७६ : विमानतळाची सुरुवात
१९७९ ते २०१२ : विमानसेवा अधिकतरवेळा बंदच
१९९३ : विमानतळ
विस्तारीकरणाची चर्चा
१९९९ : ‘राईट’ कन्सल्टन्सीने विस्तारीकरणाबाबतचा
अहवाल दिला
२००८ : भूसंपादनाच्या तिढ्यामुळे विस्तारीकरण रखडले
२०१० : भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण
२०११ : खराब धावपट्टीमुळे विमानसेवा बंद
२०१२ : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे भाडेतत्त्वावर असलेल्या विमानतळाची (एमआयडीसी) मुदत संपली
२०१३ : राज्य मंत्रिमंडळात एमआयडीसीकडून प्राधिकरणाकडे विमानतळ हस्तांतरणाचा निर्णय
जून २०१४ : गेल्या तीन वर्षांपासून बंद असलेली विमानसेवा सुरू करण्यासाठी हालचाली सुरू
आॅगस्ट २०१४ : कोल्हापूर-मुंबई-कोल्हापूर विमानसेवेसाठी ‘सुप्रीम’ने मिळविल्या ३० ‘एनओसी’

Web Title: Kolhapur: The airline is still in the air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.