ग्रामपंचायत मतदानात पुन्हा कोल्हापूरच भारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:20 IST2021-01-17T04:20:54+5:302021-01-17T04:20:54+5:30
कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा ...

ग्रामपंचायत मतदानात पुन्हा कोल्हापूरच भारी
कोल्हापूर : राज्यात १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीसाठी इर्षेने व चुरशीने ७६ .२५ टक्के मतदान झाले असून मतदानात कोल्हापूरच पुन्हा भारी ठरले आहे. लोकसभा, विधानसभेपाठोपाठ ग्रामपंचायत निवडणुकीतही कोल्हापूरात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदानाची नोंद झाली. सर्वात कमी ६८.२१ टक्के रत्नागिरी जिल्ह्यात मतदान झाले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीतील सर्वात संघर्षपूर्ण निवडणूक म्हणून ग्रामपंचायतीकडे पाहिले जाते. नात्यागोत्यासह, भाऊबंदकी उफाळून येत असल्याने सर्वच ठिकाणी संघर्षपूर्ण निवडणुका झाल्याचे पहावयास मिळाले. राज्यातील १२ हजार ६०३ ग्रामपंचायतीच्या ४६ हजार ९२१ प्रभागातील १ लाख २५ हजार ७०५ जागांसाठी दुरंगी, तिरंगी लढती झाल्या. शुक्रवारी राज्यात सगळीकडेच अतितटीने मतदान होऊन १ कोटी ६९ लाख ११ हजार ३९५ मतदारांनी हक्क बजावला.
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक ८३.८० टक्के मतदान झाले. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतही राज्यात सर्वाधिक मतदानाची नोंद कोल्हापूरात झाली होती. त्याची पुनर्रावृत्ती ग्रामपंचायत निवडणुकीत झाली. त्यापाठोपाठ बीड जिल्ह्यात ८३.५८ टक्के, भंडारा जिल्ह्यात ८२.९५ टक्के तर परभणीमध्ये ८२.९३ टक्के मतदान झाले.
‘भंडारा-गोंदियात’ महिलाराज
ग्रामपंचायतीसाठी एका एका मतासाठी उमेदवारांचे शेवटपर्यंत प्रयत्न सुरू राहिल्याने मतदान चांगले झाले. मात्र भंडारा व गोंदिया जिल्ह्यात पुरूषांपेक्षा महिलांचे मतदान अधिक होते. पुरूषांच्या तुलनेत भंडारात ३६४३ तर गोंदियात ५१० महिलांचे जादा मतदान झाले.
आडाखे बांधण्यात उमेदवार गुंग
राज्यातील ४६ हजार ९२१ प्रभागात २ लाख १४ हजार ८८० उमेदवार रिंगणात होते. या उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रणा बंद झाले असून प्रत्येक ठिकाणी चुरस निर्माण झाल्याने उमेदवारांचे जीव टांगणीला लागले आहेत. कोणत्या घरातील मतदान आपणाला झाले, कोणाचे झाले नाही,यावरून विजयी, पराजयाचे आडाखे बांधण्यात उमेदवारांसह त्यांचे समर्थक गुंग आहेत.
असे झाले जिल्हानिहाय मतदान
जिल्हा मतदानाची टक्केवारी
कोल्हापूर ८३.८०
बीड ८३.५८
भंडारा ८२.९५
परभणी ८२.९३
अहमदनगर ८२.७३
हिंगोली ८२.३२
जालना ८२.३२
दृष्टीक्षेपात राज्यातील निवडणूक
ग्रामपंचायती- १२ हजार ६०३
प्रभाग - ४६ हजार ९२१
जागा - १ लाख २५ हजार ७०५
बिनविरोध - २६ हजार ७१८
उमेदवार रिंगणात - २ लाख १४ हजार ८८०