‘कोजिमाशि’ सभेत शिवीगाळ, हाणामारी
By Admin | Updated: August 25, 2014 00:16 IST2014-08-25T00:10:13+5:302014-08-25T00:16:26+5:30
प्रश्न विचारण्यावरून गोंधळ : पोलिसाच्या अंगावर जाणाऱ्या शिक्षकास चोप

‘कोजिमाशि’ सभेत शिवीगाळ, हाणामारी
कोल्हापूर : ‘कोजिमाशि’ पतसंस्थेच्या सभेत प्रश्न विचारण्यावरून सत्तारूढ व विरोधकात एकमेकांना रोखण्याचा प्रयत्न झाल्याने गोंधळ उडाला. शिक्षकांमध्ये एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न झालाच; पण विरोधक समजून गोंधळ रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिव्हील ड्रेसवरील एका पोलिसाच्या अंगावर सत्तारूढ गटाच्या समर्थक गेल्याने तणाव निर्माण झाला. दोन तास सुरू असलेला गोंधळ पाहून पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव यांनी दम दिल्यानंतर ‘सरांचा’ ताव थोडा कमी झाला.
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवक पतसंस्थेची ४४ वी सभा आज, रविवारी शाहू सांस्कृतिक मंदिर, मार्केट यार्ड येथे अध्यक्ष दादासाहेब लाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. अहवाल वाचन रोखत काही संचालकांनी सत्तारूढ गटाच्या समर्थक असलेले बिल्ले लावल्याचे निदर्शनास आणून देत ते काढण्याची मागणी मार्तंड दुधाळ यांनी केली. आण्णाप्पा चौगले यांनी मध्येच प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आणि गोंधळास सुरुवात झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर सभा पुन्हा सुरू झाली. त्यानंतर कर्जावरील व्याज दर कमी करा, दीपावली भेटवस्तूमध्ये वाढ करा, आदी विषयांवर चर्चा झाली. शेअर्स मर्यादेवर शिवाजी पाटील बोलत असताना माईक घेण्यावरून गोंधळ उडाला. राजेंद्र रानमाळे प्रश्न विचारण्यासाठी उठल्यानंतर त्यांना रोखत विरोधी आघाडीचे तुम्ही नेते आहात, लेखी प्रश्न अगोदर देणे गरजेचे होते, असे अध्यक्ष लाड यांनी टोला हाणला. अहवाल वेळेत मिळाले नसल्याने लेखी प्रश्न देऊ शकलो नसल्याचे सांगत कर्जमुक्ती योजनेला रानमाळे यांनी हात घालत, एका -एका प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी केली. एकदम प्रश्न विचारा एकदम उत्तरे देतो, आता तुम्ही माईक सोडा, असे लाड यांनी सांगितल्यानंतर गोंधळ उडाला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत गोंधळ रोखण्याचा प्रयत्न केला, पण शिक्षक ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. काही सिव्हील ड्रेसमधील पोलीस शिक्षकांना शांत करत असताना विरोधकच आपणाला बोलू देत नाहीत, असे समजून एका शिक्षकाने शिवी देत पोलिसाच्या अंगावर गेल्याने गोंधळात भर पडली. पोलिसांच्या अंगावर हात टाकल्याचे समजताच इतर पोलिसांनी संबंधित शिक्षकांवर झडप टाकत चांगलाच चोप दिला. हा गोंधळ शांत होतो न तोच मुसळे (कुडित्रे) हे प्रश्न विचारण्यासाठी माईककडे जाताना पुढच्या रांगेत बसलेल्या सत्तारूढ समर्थकांनी अपशब्द वापरला. त्याचा जाब विचारण्यासाठी प्रा. जयंत आसगावकर व बाबा पाटील यांचे समर्थक गेले. यावेळी एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने वातावरण तणावपूर्ण बनले. शिक्षकांचा गोंधळ व पोलिसांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार ऐकून शाहूपुरीचे पोलीस निरीक्षक प्रदीप जाधव सभास्थळी आले आणि शिक्षकांना सुनावल्यानंतर सभा सुरळीत सुरू झाली. (प्रतिनिधी)