कोदे येथील खून पत्नीकडूनच

By Admin | Updated: August 19, 2015 23:25 IST2015-08-19T23:25:34+5:302015-08-19T23:25:34+5:30

खुनाचे गूढ उकलले : मुलीवरील अत्याचाराच्या रागातून घटना; खुनाची कबुली

Kodaya murdered wife | कोदे येथील खून पत्नीकडूनच

कोदे येथील खून पत्नीकडूनच

कोल्हापूर : कोदे खुर्द (ता. गगनबावडा) येथे वानरमारी समाजातील वसंत कृष्णा निकम (वय ५०) यांचा गळा चिरून चोरट्यांनी खून केला नसून, तो त्यांच्या पत्नीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. संशयित आरोपी वासंती निकम (४०) असे तिचे नाव आहे. पतीने १४ वर्षांच्या स्वत:च्या मुलीवर वारंवार अत्याचार केल्याच्या कृत्यातून तिने पतीचा खून केल्याची कबुली दिल्याचे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
वसंत निकम यांचा सोमवार (दि. १७)च्या मध्यरात्री गळा चिरून खून झाल्याचे मंगळवारी पहाटे उघडकीस आले होते. यावेळी माजी सरपंच सहदेव कृष्णा कांबळे यांनी याप्रकरणी गगनबावडा पोलिसांना वर्दी दिली. चोरट्यांनी खून केल्याच्या चर्चेने जिल्ह्यात खळबळ माजली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक मोहिते, सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र पालवे, सचिन पंडित यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठले. आजूबाजूला चौकशी केली असता, माजी सरपंच कांबळे यांनी त्यांच्या मालकीच्या ‘उगळाची मळी’ नावाच्या शेतात, वानरमारी समाजाच्या वसंत निकम यांना कुटुंबासह राहण्यासाठी जागा दिली होती. रानातील शिकार, वनौषधी विकून तसेच कांबळे यांच्या शेतात रोजगार करून ते उदरनिर्वाह करीत असल्याचे समजले.

झोपेत असताना चिरला गळा
वसंत व वासंती यांना सहा मुली व पाच मुले अशी एकूण अकरा मुले आहेत. थोरला मुलगा दीपक (वय २३) दोन वर्षांपूर्वी कोकणात नातेवाइकाचा खून केल्याने कारागृहात शिक्षा भोगत आहे. बबन (२२) हा रत्नागिरीमध्ये राहण्यास आहे. दोन मुलींची लग्ने झाली आहेत. त्यामुळे सध्या सात मुलांना घेऊन ते दोघे राहत होते. वसंत हा नेहमी दारू पिऊन येत असे. त्यावेळी तो १४ वर्षांच्या मुलीवर पत्नी व अन्य मुलांसमोरच जबरदस्तीने अत्याचार करीत असे. याला वासंतीने विरोध केल्यास तो तिला मारहाण करीत असे. त्यामुळे निमूटपणे त्याचा हा त्रास ती सहन करीत होती. सोमवारी (दि. १७) दोघेजण कोल्हापूरला येऊन पाच हजार रुपयांच्या गाददळीच्या बिया विक्री करून परत घरी आले. यावेळी वसंत याने दारू पिऊन जेवण केले. त्यानंतर तो पुन्हा मुलीवर अत्याचार करणार म्हणाला. यावेळी पत्नी वासंतीने त्याला विरोध केला असता त्याने तिच्यासह मुलांना मारहाण केली. मध्यरात्रीच्या सुमारास सुडाने पेटलेल्या वासंतीने त्याचा झोपेतच कोयत्याने गळा चिरून खून केला. त्यानंतर मुलांना सोबत घेऊन ती अंधारातून सुमारे सात किलोमीटर अंतर चालत माजी सरपंच कांबळे यांच्या घरी आली. यावेळी तिने तोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघा चोरट्यांनी पतीला मारहाण केल्याचे सांगितले. त्यानंतर कांबळे यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता खून झाल्याचे दिसून आले.

मुलांची सुधारगृहात रवानगी
वासंतीला १ ते १४ वर्षांपर्यंतची मुले आहेत. तिला पोलीस मुख्यालयात आणल्यानंतर तिच्या अवतीभोवती तिची सर्व मुले तिला लपेटून बसली होती; तर पीडित मुलगी छोट्या भावाला खेळवीत होती. दृश्य पाहून पोलीसही गहिवरले. पोलिसांनी त्या मुलांना बिस्किटे दिली. या मुलांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक मोहिते यांनी सांगितले.

मुलीकडून खुनाचा उलगडा
गेल्या महिन्याभरापासून करवीर, पन्हाळा परिसरात चोरांच्या अफवा आहेत. निकम कुटुंब जंगलात कुडाच्या बांबूची झोपडी बांधून राहिले होते. घटनास्थळावरील पाहणी करून त्यांनी वासंतीकडे चौकशी केली असता तिने चोरट्यांनी खून केल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस निरीक्षक मोहिते यांनी १४ वर्षांच्या मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिने वडील माझ्यावर अत्याचार करीत होते. त्याला आईने विरोध केल्यास मारहाण केली जात होती. त्यानंतर पोलिसांनी वासंतीला ताब्यात घेत खुनाचे कारण विचारले असता मुलीच्या रक्षणासाठी आपण पतीचा खून केल्याची तिने कबुली दिली. तिच्याकडून खुनातील कोयता पोलिसांनी जप्त केला.

Web Title: Kodaya murdered wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.