एक पोर अन् गावाला घोर
By Admin | Updated: April 8, 2015 00:30 IST2015-04-07T22:03:34+5:302015-04-08T00:30:38+5:30
तिसऱ्या अपत्यावरून रामायण : आजरा तालुक्यातील मजेशीर किस्सा

एक पोर अन् गावाला घोर
ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -गावच्या पोलीसपाटलाला पोरगा झाला. कुटुंबीय सर्व आनंदात असतानाच हे अपत्य ‘तिसरे’ असल्याचे काही मंडळींच्या लक्षात आले. पाटलाच्या विरोधकांनी पाटील पदावरूनच त्याला बाजूला करण्याचा चंग बांधला आहे.
याच कारणावरून बाळाच्या आईचे अंगणवाडी सेविकापदही धोक्यात आणण्यासाठी विरोधक एकवटले आहेत. कागदी घोडे तालुकापातळीवरून जिल्हा पातळीवर नाचू लागल्याने याची मजेशीर चर्चा सध्या सुरू झाली आहे.
गावच्या पोलीसपाटलाचा आब बघून अनेकांची नजर या पदावर
आहे. भरीस भर म्हणून पत्नीही अंगणवाडी सेविका. तिसरे अपत्य झाल्यानंतर एकाच दगडात दोन
पक्षी मारण्याची संधी विरोधकांना आयती सापडली. पोलीसपाटीलही बेरका माणूस. त्याला तिसरे
अपत्य झाल्याचा गावकऱ्यांचा दावा, तर आपणाला तिसरे अपत्यच
नाही, असा आरोप पाटील व अंगणवाडी सेविकेचे म्हणणे. तक्रार थेट तालुका पातळीवरून जिल्हा पातळीवरून. तिसरे अपत्य झाले असल्याचे पुरावे सादर करण्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे.
तिसरे अपत्य झाल्याचा पुरावा गावकऱ्यांना सापडेना. अपत्य
झाले, पण कागदोपत्री पुरावा
नाही असे गावकऱ्यांचे म्हणणे, तर पुरावा द्या, कारवाई करतो अशी पदाधिकाऱ्यांची भूमिका. गेले तीन महिने हा प्रकार सुरू आहे. या सर्व प्रकारात अधिकारी वर्ग मात्र नाहक अडचणीत आला आहे. ‘पोलीसपाटलाचं एक पोर अखंड गावासह अधिकाऱ्यांच्या जिवाला घोर’ अशी अवस्था सध्या झाली
आहे.