जगातील संशोधनविषयक ज्ञानाचे भांडार खुले : पवार
By Admin | Updated: August 1, 2014 00:37 IST2014-07-31T23:45:17+5:302014-08-01T00:37:53+5:30
शिवाजी विद्यापीठात अकॅडेमिक रिसोर्स सेंटरचे उद्घाटन

जगातील संशोधनविषयक ज्ञानाचे भांडार खुले : पवार
कोल्हापूर : अकॅडेमिक रिसोर्स सेंटरच्या माध्यमातून संशोधक विद्यार्थी, प्राध्यापकांसाठी जगातील संशोधनविषयक ज्ञानाचे भांडार शिवाजी विद्यापीठात खुले झाले आहे. सामाजिक शास्त्रांसह कला शाखांकडील विद्यार्थ्यांनासुद्धा संशोधनाचा दर्जा अधिक वाढविण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी आज, गुरुवारी येथे केले.
विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील अकॅडेमिक रिसोर्स सेंटरच्या (शैक्षणिक संदर्भ केंद्र) उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
डॉ. पवार म्हणाले, विद्यापीठातील संशोधन अधिकाधिक उपयुक्त व मूलभूत होण्याच्या दृष्टीने या सेंटरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. सामाजिक शास्त्रांसह कला शाखांकडील विद्यार्थ्यांनासुद्धा संशोधनाचा दर्जा अधिक वाढविण्यासाठी हे सेंटर उपयुक्त ठरणारे आहे. वाङ्मयचौर्य रोखण्याच्या कामीसुद्धा या सेंटरची भूमिका महत्त्वपूर्ण असणार आहे. याठिकाणी संशोधक विद्यार्थ्यांसाठी भाषा, संवाद तसेच इतर कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण, कार्यशाळांचे आयोजन करता येणार आहे.
कार्यक्रमात डॉ. आर. के. कामत यांनी सेंटरच्या कार्यपद्धतीची उपस्थितांना माहिती दिली. त्यानंतर टनिटिन कंपनीच्या अनुराग गुप्ता यांनी वाङ्मयचौर्य ओळखणाऱ्या सॉफ्टवेअरविषयी सादरीकरण केले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. अशोक भोईटे, कुलसचिव डॉ. डी.व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. अर्जुन राजगे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, इंटरनेट विभागाचे प्रमुख डॉ. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते. ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांनी प्रास्ताविक केले. (प्रतिनिधी)