कायदे, तरतुदींची माहिती घ्या, ‘व्हॅट’ची नाही भीती
By Admin | Updated: December 15, 2014 23:56 IST2014-12-15T23:31:14+5:302014-12-15T23:56:35+5:30
किशोर गोहोकर : व्यापाऱ्यांना कार्यक्रमात मूलमंत्र

कायदे, तरतुदींची माहिती घ्या, ‘व्हॅट’ची नाही भीती
कोल्हापूर : कायदे अन् तरतुदींची सखोल माहिती घेऊन आपली व्यवहाराची कागदपत्रे व रेकॉर्ड अद्ययावत ठेवल्यास व्यापाऱ्यांना ‘व्हॅट’ची भीती बाळगायची गरज नाही, असा मूलमंत्र विक्रीकर विभागाचे निवृत्त अतिरिक्त आयुक्त डॉ. किशोर गोहोकर (मुंबई) यांनी नुकताच येथे दिला.
क्षत्रिय मराठा चेंबर आॅफ कॉमर्सतर्फे उद्यमनगरातील रामभाई सामाणी हॉल येथे ‘सभासदांसाठी प्रेरणा, ध्येयनिश्चिती, व्हॅट संदर्भातील कायदे, तरतुदी व विचार’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते.
गोहोकर म्हणाले, भारतासह जगातील १३० देशांत ‘वॅट’ हा कर लागू आहे. व्यापाऱ्यांनी या कराची भीती बाळगण्याची गरज नाही. पूर्वीच्या करप्रणालीत कागदपत्रे सादर करण्यासाठी अधिकाऱ्यांकडे जावे लागायचे; परंतु व्हॅटमुळे अधिकारी व्यापाऱ्यांकडे येऊन पाहणी करतात. तपासणी अधिकाऱ्यांकडून काही चूक झाल्यास व्यापाऱ्यांनी त्यांच्या निदर्शनास आणाव्यात, यासाठी या कराविषयी कायद्याचे ज्ञान व तरतुदींची सखोल माहिती असणे गरजेचे आहे. त्रुटीबद्दल अतिउत्साही अधिकारी नोटिसा पाठवितात; म्हणून व्यापाऱ्यांनी घाबरू नये, याबाबत न्यायालयात जायचीही तरतूद आहे.
यावेळी अध्यक्ष दिलीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूरजितसिंह पवार यांनी स्वागत केले. महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मनोगत व्यक्त केले. अॅड. रणजित घाटगे यांनी सूत्रसंचालन केले. समीर काळे यांनी आभार मानले. यावेळी वीणा गोहोकर, सूरराजेश शहा यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
‘जीएसटी’ लागू होणार...
व्हॅट आल्यावर पूर्वीचे कर गेले. ‘जीएसटी’ कर आल्यावर हा करसुद्धा जाईल. व्यापारी इतक्या प्रकारचे कर भरतात; त्यापेक्षा हा एकच कर भरणे सोयीचे आहे. तो लवकरच येण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.
हा फरक लक्षात घ्या
ड्यूटी, टॅक्स आणि सेस यांतील फरकाविषयी डॉ. गोहोकर यांनी माहिती दिली. ड्यूटी ही वस्तूंवर (उदा. कस्टम ड्यूटी) असते. टॅक्स हा वस्तूंवर, माणसांवर (उदा. इन्कम टॅक्स), सेस हा आॅक्ट्रॉयवर असतो. ड्यूटी व टॅक्सवर जमा झालेले कर हा राज्यासाठी खर्च करायचा असतो; तर सेसमधून जमा झालेला कर हा ज्या शहरातून जमा झाला, त्या ठिकाणीच खर्च करावा लागतो.