कळे येथे महिलेवर चाकू हल्ला

By Admin | Updated: August 25, 2015 00:06 IST2015-08-25T00:01:36+5:302015-08-25T00:06:45+5:30

अज्ञाताचे कृत्य : महिलांचा चार तास रास्ता रोको; हल्लेखोर पकडण्याची मागणी

A knife attack on woman here at Kale | कळे येथे महिलेवर चाकू हल्ला

कळे येथे महिलेवर चाकू हल्ला

कळे : जनावरांच्या गोठ्यात धार काढण्यासाठी गेलेल्या वंदना आनंदा पाटील (वय ४२) यांच्यावर अज्ञात व्यक्तीने चाकू हल्ला करून पोबारा केला. कळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यासंबंधी कळे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवर फिर्याद नोंदविली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वंदना पाटील यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस जनावरांचा गोठा आहे. सकाळी सुमारे सव्वासातच्या दरम्यान त्या म्हैशीची धार काढण्यासाठी गोठ्यात गेल्या. घरात दोन लहान मुले होती. धार काढून दुधाची किटली घेऊन उठत असतानाच अज्ञात व्यक्तीने वंदना यांना दोन-तीन थप्पड मारल्या. अचानक घडलेल्या या प्रकाराने त्या बेशुद्ध पडल्या. यावेळी हल्लेखोर व्यक्ती पसार झाली. हनुवटीवर चाकू हल्ला झाल्याचे लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांना उपचारासाठी कळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. ही बातमी पन्हाळा पश्चिम भागांसह धामणी खोऱ्यात पसरली आणि सर्वत्र घबराटीचे वातावरण निर्माण झाले. याबाबत सर्व गावांतून शासन आणि पोलिसांविषयी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
यावेळी संतप्त झालेल्या महिलांनी वंदन यांच्या हल्लेखोरांना तत्काळ शोधून काढावे म्हणून कळे पोलीस ठाण्याच्या दारात ठिया आंदोलन केले. पोलिसांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्याने जमावाने कळे दस्तुरीवर रास्ता रोको आंदोलन केले. गगनबावडा, कोल्हापूर, बाजार भोगाव विभागांतील वाहने थांबविली. हे चक्का जाम आंदोलन सुमारे चार तास सुरू होते. यावेळी चोरटे, हल्लेखोर यांचा बंदोबस्त करावा, अशा घोषणा जमावाकडून येत होत्या. यावेळी पन्हाळ््याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, कळेच्या सहायक पोलीस निरीक्षक मीना जगताप यांनी जमावाला शांततेचे आवाहन केले. लोकांनी सुरक्षेबाबत कायदा हातात न घेता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन केल्यानंतर आंदोलक शांत झाले.

Web Title: A knife attack on woman here at Kale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.