गोकुळ शिरगाव : गोकुळ शिरगाव येथे बहिणीसोबत वारंवार बोलण्याच्या वादातून झालेल्या चाकूहल्ल्यात दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बुधवारी दुपारी अडीच वाजता गोकुळ शिरगाव येथील एमएसईबी ऑफिससमोर घडली.या प्रकरणी फिर्यादी साहिल शिवाजी वाघमारे (वय २१, कागले माळ, गोकुळ शिरगाव) यांनी गोकुळ शिरगाव पोलिसात तक्रार दिली आहे. संशयित आरोपींमध्ये सौरभ मोहन चोरडे (रा. कणेरी), आयूष चव्हाण (रा. कणेरीवाडी), सनी चव्हाण (रा. कणेरीवाडी) आणि एक अनोळखी व्यक्ती यांचा समावेश आहे. या हल्ल्यात वैभव तानाजी पाटील आणि सौरभ चोरडे हे गंभीर जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, संशयित आरोपी सौरभ मोहन चोरडे याने वैभव पाटील याला भेटण्यासाठी बोलावले होते. यावेळी चोरडेचा मित्र शिवानंद कणेरी येथे जात असताना, वैभव पाटील याने सौरभ चोरडेची माफी मागण्यास सुरुवात केली. मात्र, याचवेळी सौरभ चोरडेने वैभव पाटीलच्या कानशिलात लावून त्याच्या डोक्यात हातातील बिअरची बाटली मारून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर सनी चव्हाण आणि एका अनोळखी व्यक्तीने वैभवला धरून ठेवले असता, आयूष चव्हाण याने चाकूने त्याच्या हातावर वार करून त्याला जखमी केले आणि शिवीगाळ करत मारहाण केली.फिर्यादी साहिल वाघमारे आणि त्याचा मित्र शिवानंद हे भांडण सोडवण्यासाठी गेले असता, अजित चव्हाण आणि सनी चव्हाण यांनी त्यांना मारहाण केली आणि ''परत आमच्या नादाला लागला तर जिवंत सोडणार नाही'' अशी धमकी दिली. याप्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मगदूम करत आहेत.
Kolhapur: बहिणीशी बोलल्याच्या वादातून चाकूहल्ला, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 16:21 IST