मुलींची छेड काढल्याची विचारणा केल्याने गुन्हेगाराकडून चाकू हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:30 IST2021-08-17T04:30:47+5:302021-08-17T04:30:47+5:30
इचलकरंजी : येथील सुंदर बागेजवळ मुलींची छेड काढल्याची विचारणा केल्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चाकू हल्ला केला. त्यामध्ये अफान सलीम ...

मुलींची छेड काढल्याची विचारणा केल्याने गुन्हेगाराकडून चाकू हल्ला
इचलकरंजी : येथील सुंदर बागेजवळ मुलींची छेड काढल्याची विचारणा केल्याने एका रेकॉर्डवरील गुन्हेगाराने चाकू हल्ला केला. त्यामध्ये अफान सलीम मानकर (वय १९, रा.निरामय हॉस्पिटलजवळ) हा महाविद्यालयीन युवक जखमी झाला. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत गावभाग पोलीस ठाण्यात सुरू होते.
सलमान राजू नदाफ (वय २१, रा.गावभाग) असे हल्ला करणाऱ्या संशयिताचे नाव आहे. याच्यासह त्याच्या दोघा साथीदारांना ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, शहरातील एका खासगी क्लासमध्ये अफान मानकर व त्याचा मित्र सुहास फराकटे शिक्षण घेतात. ते सोमवारी सायंकाळी सुंदर बाग परिसरात नाष्टा करण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्यांच्या क्लासमध्ये शिकणाऱ्या काही मुलीही त्याठिकाणी आल्या होत्या. त्यांची सलमान नदाफ व त्याच्या आणखी एका साथीदाराने छेड काढण्याचा प्रयत्न केला. मुलींनी ही माहिती मानकर व फराकटे यांना दिली. त्या दोघांनी संशयितांकडे विचारणा केली असता नदाफ व त्याच्या एका साथीदाराने वाद घालण्यास सुरुवात केली. नदाफ याने सोबत आणलेल्या चाकूने मानकर याच्यावर हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात मोठी गर्दी जमली. दरम्यान, संशयित नदाफ हा आपल्यावरच हल्ला झाल्याचे सांगत अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात गेला. त्यानंतर संशयितांना पोलीस ठाण्यात आणण्यात आले. सलमान नदाफ याच्यावर खुनासह अन्य गंभीर गुन्हे दाखल आहेत. नुकताच तो कोरोनाच्या अनुषंगाने बाहेर आला आहे. याबाबत तक्रार देण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, उपअधीक्षक बी.बी .महामुनी आदींनी गावभाग पोलीस ठाण्याला भेट देऊन माहिती घेतली.