‘केएमटी’ देणार तिमाही पास
By Admin | Updated: December 12, 2014 23:37 IST2014-12-12T23:22:22+5:302014-12-12T23:37:13+5:30
प्रशासनाचा निर्णय : जानेवारीपासून सुरुवात, शाहू मैदानाजवळ आणखी एक केंद्र--‘लोकमत’ हेल्पलाईन

‘केएमटी’ देणार तिमाही पास
कोल्हापूर : केएमटीतून प्रवास करणाऱ्यांसाठी तीन महिन्यांचा पास देण्याचा निर्णय केएमटी प्रशासनाने घेतला आहे. येथील महाराणा प्रताप चौकातील पास वितरण केंद्रावर होणारी गर्दी लक्षात घेवून असेच आणखी एक केंद्र शाहू मैदानाजवळ सुरु करण्यात येणार असल्याची माहिती व्यवस्थापक संजय भोसले यांनी आज, शुक्रवारी ‘लोकमत’ला दिली. एका जागरुक पालकाने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे तशी मागणी केली. ‘लोकमत’ने केएमटी प्रशासनाच्या ती निदर्शनास आणून दिली असता त्यांनी तातडीने तसा निर्णय घेतला. या निर्णयामुळे पास काढणाऱ्या दहा हजार विद्यार्थ्यांच्या पालकांची मोठी सोय होणार आहे.
कोल्हापूर म्युनिसिपल ट्रान्स्पोर्ट (केएमटी)च्या बसद्वारे प्रवास करणाऱ्या शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पासद्वारे ४० ते ६० टक्क्यांपर्यंत बसच्या मासिक भाड्यामध्ये सवलत दिली जाते. दहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांना ४० टक्के, सातवी ते दहावीपर्यंत ५० टक्के, तर पहिली ते सातवीपर्यंत ६० टक्के मासिक भाड्यामध्ये केएमटी सवलत देते. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांना याचा मोठा लाभ होतो.
विद्यार्थ्यांच्या संख्येच्या मानाने केएमटीचे पास वाटप केंद्र मात्र एकच महाराणा प्रताप चौक येथेच आहे. त्यामुळे उपनगरांसह शहर व वडगाव, करवीर तालुक्यातील पालक व विद्यार्थ्यांना पाससाठी ताटकळत थांबावे लागते. याचा अनुभव घेतलेल्या टोप (ता. हातकणंगले) येथील सतीश शहापूरकर या पालकांनी ‘लोकमत हेल्पलाईन’ला गुरुवारी संपर्क साधला. त्यांचा मुलगा व मुलगी पासचा वापर करतात. मुलांचा पास काढण्यासाठी त्यांना महिन्यांतून दोनवेळा रांगेत थांबावे लागत होते. त्यादिवशी त्यांना रजाच काढावी लागे. हे टाळण्यासाठी केएमटीनेही रेल्वेप्रमाणे तीन-तीन महिन्यांचा पास एकदाच द्यावा, त्यामुळे पालकांचे हेलपाटे वाचतील असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी केलेली सूचना योग्य असल्याने ‘लोकमत’ने केएमटी व्यवस्थापनाकडे त्यासंबंधीची विचारणा केली. त्यावर व्यवस्थापक भोसले म्हणाले, ‘तिमाही पासची सुविधा सुरु करण्यात कोणतीच अडचण नसून नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यापासून तसे पास पालकांना देण्यात येतील.
पालकांना पाससाठी रांगेत तिष्ठत थांबावे लागू नये यासाठी शाहू मैदान चौकात आणखी एक पास वाटप केंद्र तातडीने सुरू करण्यात येईल. तिमाही पासमुळे विद्यार्थी व पालकांचा वेळ वाचणार आहे. तसेच केएमटीकडे आगाऊ पैसेही उपलब्ध होतील. (प्रतिनिधी)
के एमटी प्रशासनाने गेली आठ महिने विद्यार्थ्यांना पाससाठी आवश्यक असणारी ओळखपत्रे दिलेली नाहीत. पावतीच्या आधारेच नवीन पास दिला जातो. अनेक पालक व विद्यार्थ्यांकडून पावती गहाळ होण्याचे प्रमाण अधिक आहे. नेमका त्याच विद्यार्थ्याने पासचा वापर करावा, यासाठीही हे ओळखपत्र महत्त्वाचे आहे. मात्र, केएमटी प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे.
- तुकाराम पाटील (पालक)