केएमटी कर्मचारीही वडाप विरोधात रस्त्यावर
By Admin | Updated: April 9, 2017 00:43 IST2017-04-09T00:43:11+5:302017-04-09T00:43:11+5:30
शनिवारी दिवसभर बिंदू चौक, लुगडी ओळ, मध्यवर्ती बसस्थानक (समाधान थांबा) या प्रमुख थांब्यांवर थांबून वडाप रिक्षांना पिटाळून लावले.

केएमटी कर्मचारीही वडाप विरोधात रस्त्यावर
कोल्हापूर : आर. टी. ओ. कार्यालयाकडून शहरातील वडाप विरोधात कारवाई सुरूझाल्यानंतर आता ‘केएमटी’चे कर्मचारीही वडापला आळा घालण्याकरिता रस्त्यावर उतरले आहेत. शनिवारी दिवसभर शहरातील काही प्रमुख मार्गावरील बसथांब्यावर वडाप रिक्षांना कर्मचाऱ्यांनी पिटाळून लावले. दरम्यान, वडाप बंद होत असल्यामुळे केएमटीच्या उत्पन्नात दिवसात दीड लाखांची जादा भर पडली.
शहरातील वडाप रिक्षा वाहतुकीमुळे केएमटीची आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे परिवहन समिती सभापती नियाज खान यांनी उपमहापौर अर्जुन माने, स्थायी सभापती संदीप नेजदार यांच्यासह सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी डी. टी. पवार यांची भेट घेतली होती. वडाप करणाऱ्या सर्व प्रकारच्या रिक्षा तसेच सहा आसनी रिक्षांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. शुक्रवारी एकच दिवस प्रादेशिक परिवहन कार्यालयाने कारवाई केली. शनिवारी सुटी असल्याने कारवाई झाली नाही; परंतु केएमटीचे कर्मचारीही आता रस्त्यावर उतरले असून, त्यांनी शनिवारी दिवसभर बिंदू चौक, लुगडी ओळ, मध्यवर्ती बसस्थानक (समाधान थांबा) या प्रमुख थांब्यांवर थांबून वडाप रिक्षांना पिटाळून लावले. केएमटी प्रशासनाने पन्नास मीटर अंतराच्या आत रिक्षा थांबा असू नये म्हणून बस थांब्यावर पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत. केएमटीचे दैनंदिन उत्पन्न साडेसात लाख रुपयांपर्यंत खाली आले होते; पण वडाप बंद करण्यात आल्यामुळे दोन दिवस ते साडेआठ लाखांपर्यंत पोहोचले आहे. (प्रतिनिधी)