के.एम.टी.ला पगारासाठी ४२ लाख
By Admin | Updated: July 8, 2014 01:06 IST2014-07-08T01:02:27+5:302014-07-08T01:06:34+5:30
स्थायी’च्या बैठकीत निर्णय : सदस्यांनी उचलून धरली मागणी

के.एम.टी.ला पगारासाठी ४२ लाख
कोल्हापूर : म्युनिसिपल ट्रान्स्पोर्टच्या (के.एम.टी.) रोजंदारी कर्मचाऱ्यांचे पगार गेले दोन महिने थकले आहेत. नव्या बसेस येईपर्यंत के.एम.टी. व्यवस्थापनास महापालिकेने आर्थिक मदत करावी, अशी मागणी काही सदस्यांनी आज, सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्यामुळे सभापती सचिन चव्हाण यांनी के.एम.टी.ला तत्काळ ४२ लाखांची मदत देण्याचे आदेश प्रशासनाला दिले. महापालिकेच्या आर्थिक आधारामुळे किमान दैनंदिन खर्च भागविण्यासाठी के.एम.टी.ची सुरू असलेली धडपड कमी होण्यास मदत होणार आहे.
पगार वेळेत मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांनी के.एम.टी.कडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, चालक-वाहकांअभावी के.एम.टी.च्या अनेक बसेस थांबून राहतात. दररोज सव्वादोन लाखांचा तोटा घेऊन प्रवास करणाऱ्या के.एम.टी.समोरील आव्हान दिवसेंदिवस वाढतच आहे. के.एम.टी.कडे सध्या ९० ते ९५ बसेस रस्त्यांवर धावतात. दररोज एक बस किमान २५० कि.मी.चे अंतर कापूनही दिवसाकाठी सरासरी सव्वादोन लाखांच्या नुकसानीची भर पडत आहे. नव्या बसेसमुळे जुन्या भंगार गाड्यांचा दुरुस्तीचा खर्च कमी होऊन चांगले दिवस येतील, अशी आशा के.एम.टी. प्रशासनास आहे. नवीन गाड्यांची खरेदी प्रक्रिया निविदेत अडकली आहे. त्यातच उत्पन्नवाढीचा कोणताही ठोस कार्यक्रम व्यवस्थापनाच्या हाती नसल्याने के.एम.टी.चे दुखणे वाढतच आहे.
गेल्या वर्षभरात उत्पन्नवाढीसाठी बैठका व पोलिसांना अवैध वाहतूक रोखण्यासाठी केलेला पत्रव्यवहार वगळता व्यवस्थापनाला काहीही करता आलेले नाही. दुसरीकडे पगार थकल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. ८५० कुटुंबांची आर्थिक कुचंबणा होत आहे. कर्मचाऱ्यांनी आता के.एम.टी.कडे पाठ फिरविण्यास सुरुवात केली आहे. कर्मचारी नसल्याने बसेस थांबवून ठेवण्याची नामुष्की व्यवस्थापनावर आली आहे. के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा पगार थकण्याचे प्रमाण वाढले आहे. कामगारांची आर्थिक अवस्था बिकट असताना महापालिका या प्रश्नाकडे लक्ष देणार आहे की नाही, असा सवाल स्थायी समितीच्या बैठकीत सदस्यांनी उपस्थित केला. महापालिकेने ठोस आर्थिक मदत करण्यासाठी पाऊल उचलल्याने के.एम.टी.ला आधार मिळणार आहे.
रंकाळ्यात मिसळणारे दूषित पाणी दुधाळी नाल्याकडे वळविताना प्राथमिक चाचणी घेण्याचीही तसदी संबंधितांनी घेतली नसल्यानेच पुन्हा दूषित पाणी रंकाळ्यात सोडावे लागत असल्याची खंत सदस्यांनी व्यक्त केली. बालसंकुलाच्या पिछाडीस रस्त्यावर सांडपाणी येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरल्याची तक्रार बैठकीत करण्यात आली. झोपडपट्टी सुधार योजेनतील काम व्यवस्थित होत नाही. अधिकारी लक्ष देत नसल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणून दिले.