‘केएमटी’ बस धडकेत बालक जागीच ठार
By Admin | Updated: October 12, 2014 01:07 IST2014-10-12T01:02:14+5:302014-10-12T01:07:11+5:30
बहीण गंभीर जखमी : सुभाषनगर येथे घरासमोरच दुर्घटना : चालकास चोप; जमावाकडून बसची तोडफोड

‘केएमटी’ बस धडकेत बालक जागीच ठार
कोल्हापूर : सुभाषनगर कोंडाळ्याजवळ क्रिकेट खेळण्यासाठी घरातून धावत रस्त्यावर आलेल्या बहीण-भावास भरधाव केएमटी धडक दिली. त्यामध्ये ऋतुराज संजय गवळी (वय ५) याचा जागीच मृत्यू झाला; तर त्याची बहीण वैष्णवी (९) गंभीर जखमी झाली. अपघाताचे दृश्य पाहून अनेकांना कापरे भरले. दरम्यान, संतप्त जमावाने केएमटी बसची तोडफोड करीत चालक गुंगा गोपाळ जानकर (५१, रा. बांबवडे, ता. शाहूवाडी) याला बेदम चोप देत राजारामपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. ही घटना आज, सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी सांगितले, ऋतुराज हा बालवाडीत शिकत होता, तर वैष्णवी पहिलीत शिकते. त्यांचे वडील संजय गवळी हे मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, जिल्हा परिषदेसह अन्य शासकीय कार्यालयांत जाऊन बूट पॉलिशचा फिरता व्यवसाय करतात. सुभाषनगर येथील साईमंदिर कोंडाळ्याजवळ रस्त्याला लागून त्यांचे घर आहे. आज दुपारी जेवण करून ते व पत्नी झोपले होते.
सायंकाळी पाचच्या सुमारास वैष्णवी व ऋतुराज क्रिकेट खेळण्यासाठी घरातून धावत बाहेर पडले. यावेळी ‘केआयटी’मार्गे मोरेवाडीहून शिरोलीकडे भरधाव जाणाऱ्या केएमटी बसने त्यांना जोराची धष दिली.
यावेळी बसचे उजव्या बाजूचे पुढचे चाक ऋतुराजच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला; तर वैष्णवी फरफटत गेल्याने तिच्या डोक्याला व पाठीला जोराचा मार लागला. भरचौकात झालेला हा अपघात पाहून नागरिकांनी आरडाओरड केली. गोंधळ पाहून त्यांचे आई-वडील धावत बाहेर आले. ऋतुराजचा चेंदामेंदा झालेला पाहून दोघांनाही भोवळ आली.
नागरिकांनी या दोघांना सावरत जखमी वैष्णवीला तातडीने सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल केले. याठिकाणी तिच्यावर प्राथमिक उपचार करून खासगी रुग्णालयात हलविले. काही वेळाने त्यांचे आई-वडील शुद्धीवर आले. त्यांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. दरम्यान, संतप्त जमावाने केएमटी बसची प्रचंड तोडफोड केली. चालक गुंगा जानकर याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अपघाताची नोंद करून चालकाला अटक केली.
बॅट घेऊन आला काळ
ऋतुराज व वैष्णवी नेहमी रस्त्यावर क्रिकेट खेळतात. वाहनाखाली सापडतील म्हणून त्यांच्या आईने बॅट माळ्यावर दडवून ठेवली होती. दुपारी आई झोपलेली पाहून त्यांनी वडिलांकडून बॅट खेळण्यास मागितली. ती घेऊन घराबाहेर पडताच काळाने त्यांच्यावर घाला घातला. ‘बॅट दिली नसती, तर आता माझं पोर माझ्यासोबत असतं,’ असा आक्रोश त्यांची आई ‘सीपीआर’च्या आवारात करीत होती.
आजीचा अक्रोश
दोघांची आजी धुण्या-भांड्याची कामे करण्यासाठी सकाळी बाहेर गेली होती. तिला शेजारील तरुणाने मोटारसायकलवरून ‘सीपीआर’मध्ये आणले. नागरिकांची गर्दी, मुलगा व सुनेचा आक्रोश पाहून तिनेही टाहो फोडला. ऋतुराजच्या मृत्यूची बातमी समजताच ती बेशुद्ध पडली. (प्रतिनिधी)