के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा सभापती, अधिकाऱ्यांना घेराव
By Admin | Updated: September 1, 2015 00:09 IST2015-09-01T00:09:57+5:302015-09-01T00:09:57+5:30
थकीत पगार प्रश्न : कार्यालयात गोंधळ, १० सप्टेंबरपर्यंत पगार देण्याचे आश्वासन

के.एम.टी. कर्मचाऱ्यांचा सभापती, अधिकाऱ्यांना घेराव
कोल्हापूर : दोन महिन्यांच्या थकीत पगारासाठी सोमवारी, दुपारी के.एम.टी. तील कर्मचाऱ्यांनी परिवहन सभापती व अधिकाऱ्यांना घेरावो घालून जाब विचारला. सुमारे तासाभराच्या चर्चेनंतर जुलै महिन्याचा पगार १० सप्टेंबरपर्यंत देण्याचे अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक संजय भोसले यांनी मान्य केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. परिवहन समिती सदस्यांची बैठक सुरू असताना कर्मचाऱ्यांनी थेट बैठक हॉलमध्ये प्रवेश करून न्याय मागितला. त्यामुळे काही काळ कार्यालयात गोंधळ निर्माण झाला होता.
वर्कशॉप व कार्यालयीन कर्मचाऱ्यांचे जुलै महिन्याचा पगार देण्यात आला आहे; पण हंगामी आणि कायम सेवेतील चालक आणि वाहकांचे जुलै महिन्याचे एकूण सुमारे ४८ लाख रुपये पगार देणे आहे. सप्टेंबर महिना संपला तरीही पगार हातात न मिळाल्याने कर्मचारी संतप्त झाले. या कर्मचाऱ्यांनी सोमवारी दुपारी परिवहन विभागाची बैठक सुरू असताना थेट कार्यालयात प्रवेश करून सभापती अजित पवार आणि अतिरिक्त परिवहन अधिकारी संजय भोसले यांना जाब विचारला.
गतवर्षी सप्टेंबर १४ रोजी पगार आम्हाला दिलेला नाही. तोंडावर सण आल्याने तो थकीत पगार द्यावा, असेही कर्मचाऱ्यांनी सांगितले. यावेळी कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन, भोसले म्हणाले, महापालिकेकडून २५ लाख रुपये अर्थसहाय मिळणार असल्याने येत्या १० सप्टेंबरला कर्मचाऱ्यांचा जुलै महिन्याचा थकीत पगार देण्यात येईल.
सुमारे तासभर सुरू असलेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. यावेळी सभापती अजित पवार, सदस्य यशोदा मोहिते, संगीता देवेकर, वंदना आयरेकर, शारदा देवणे, शशिकांत पाटील हे उपस्थित होते. आंदोलनात परिवहन कर्मचारी संघाचे (इंटक) अध्यक्ष रवींद्र इंगवले, नीलेश डोईफोडे, एम. डी. मुजावर, सचिन गवळी, आदी सहभागी होते.