‘केएमटी’ एक रुपयाने स्वस्त
By Admin | Updated: January 14, 2015 00:41 IST2015-01-14T00:14:56+5:302015-01-14T00:41:40+5:30
प्रवाशांना नववर्षाची भेट : लवकरच दराची अंमलबजावणी करणार

‘केएमटी’ एक रुपयाने स्वस्त
कोल्हापूर : गत सात महिन्यांत डिझेलच्या दरात झालेली घट यामुळे महापालिकेच्या परिवहन उपक्रमाकडील (के.एम.टी.) प्रशासन प्रवाशांना नववर्षाची भेट देणार आहे. ‘केएमटी’चे दर एक रुपयांनी कमी होणार आहेत. याला प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) या दरपत्रकाला मंजुरी दिली असली तरी केएमटी प्रशासनाला याबाबतचे पत्र मिळाले नाही. लवकरच या दराची अंमलबजावणी करणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
गतवर्षात केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आले. त्यानंतर सहा महिन्यांत सात -आठवेळा डिझेलचे दर कमी झाले. पण, केएमटी तिकिटाचे दर कमी झाले नव्हते. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने एक ते सात स्टेजचे (एक ते १४ किलोमीटरसाठी) दर एक रुपयांनी कमी करण्यास मंजुरी दिली.
दरम्यान, पाच आॅक्टोबर २०१३ रोजी सुधारित बसभाडे व विद्यार्थी मासिक तसेच एक साप्ताहिक, पाक्षिक, त्रैमासिक पासच्या दरामध्ये प्रशासनाने वाढ केली आहे. त्यामुळे आता तब्बल सव्वा वर्षाने प्रवाशांना दर कपातीमुळे एकप्रकारे नववर्षाची भेट मिळणार आहे. प्रवासात आता ‘वाट पाहीन; पण केएमटी बसनेच जाईन’ अशी चर्चा होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)
आरटीओंनी यांना सुद्धा दिली मंजुरी...
कोल्हापूर जिल्ह्यातील काळ्या-पिवळ्या टॅक्सींना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याकरिता परवान्यास मंजुरी
आॅटो रिक्षा व /टॅक्सीमध्ये परवाना झाला याची माहिती चालकांनी
प्रदर्शित करावी
मीटर टॅक्सी दर पहिला टप्पा २० रुपये, पुढील टप्पा १६ रुपये
पासच्या दरात २६ रुपयांची कपात होणार..
महालक्ष्मी विविध सवलत पासमध्ये यामुळे सुमारे २६ रुपयांनी कपात होणार आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा विद्यार्थी वर्गासह नोकरदार वर्ग (कामानिमित्त रोज ये-जा करणारे) यांना होणार आहे. सध्या एकदिवसीय पास पूर्ण आकार ४५ रुपये होता, तर अर्धा आकार २५ रुपये आहे. साप्ताहिक २६० रुपये, पाक्षिक (१५ दिवस) पास ४८० रुपये, मासिक पास (३० दिवस) ८२० रुपये, त्रैमासिक पास (९० दिवस) २०३५ रुपये तसेच पहिली ते सातवी गु्रप (एकवेळ जाणे व येण्यासाठी) १५५ रुपये, तर आठवी व दहावी गु्रप २१० रुपये दर आहेत. या दरामध्ये कपात होणार आहे.