पतंगरावांचे भिलवडीतील समर्थक भाजपच्या वाटेवर
By Admin | Updated: May 10, 2015 00:48 IST2015-05-10T00:46:44+5:302015-05-10T00:48:30+5:30
दोन महिन्यात पक्षप्रवेश शक्य : संजयकाका पाटील, पृथ्वीराज देशमुखांनी टाकले जाळे

पतंगरावांचे भिलवडीतील समर्थक भाजपच्या वाटेवर
शरद जाधव / भिलवडी
भिलवडी (ता. पलूस) येथील माजी वनमंत्री डॉ. पतंगराव कदम समर्थकांचा मोठा गट नाराज असून, तो भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर आहे. दोन महिन्यात मोठा कार्यक्रम घेऊन त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
पलूस-कडेगाव मतदारसंघातील भिलवडी गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील, तसेच कॉँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाते. डॉ. पतंगराव कदम यांच्या विजयामध्ये भिलवडीतील निष्ठावान कार्यकर्त्यांचे नेहमीच मोठे योगदान राहिले आहे. कदम यांनी विविध पदांचा खुबीने वापर करीत परिसरात मोठ्या प्रमाणात विकासकामेही केली. मात्र डॉ. कदमांच्या जवळ असणाऱ्या कार्यकर्त्यांचे दोन गट आहेत. एक केवळ फायद्यासाठी जवळ असणारा व दुसरा प्रामाणिकपणे राबणारा. गेल्या काही वर्षांमध्ये प्रामाणिक कार्यकर्त्यांना कदम परिवाराकडून सहकार्य मिळत नाही, असे बोलले जाते. दोन्ही गटांमध्ये श्रेयवादावरून तसेच एकमेकांची उणीदुणी काढण्यावरून वाद होतात. एक गट दुसऱ्या गटाचे खच्चीकरण करण्याची संधी सोडत नाही. यामुळे भिलवडी जिल्हा परिषद गटातील समदु:खी, नाराज कार्यकर्ते एकत्र येत आहेत. सध्या राज्यात युतीचे सरकार असल्याने अपेक्षित विकासकामे होतील का, असाही प्रश्न आहे. यामुळे काही ठेकेदार कार्यकर्त्यांनी वरून कॉँग्रेस आणि आतून भाजप असा पवित्रा घेतला आहे. काही नेतेमंडळी दोन्हीकडे समान अंतर ठेवून आहेत.
यातच खासदार संजय पाटील व माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी भिलवडी जिल्हा परिषद गटामध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जनसंपर्क वाढविला आहे. या दोघांच्या गाडीमधून, तालुक्यातील विविध कार्यक्रमांमधून ही नेतेमंडळी दिसत आहेत. कॉँग्रेसच्या कळपातील नाराजांना शोधून, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू आहे.
दुसरीकडे कॉँग्रेसच्या नेतेमंडळींमध्ये कमालीची निष्क्रि यता असून फक्त निवडणुकीपुरती ‘चमको’गिरी करणाऱ्या नेत्यांचा भरणा अधिक आहे. यामध्ये विशेषत: तरुण फळीतील कार्यकर्ते राजकीय पुनर्वसनासाठी पर्यायाच्या शोधात आहेत. त्यांना आजमितीस तरी भाजपशिवाय दुसरा पर्याय दिसत नाही. भिलवडी व माळवाडी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी भाजपचे आलिशान कार्यालय उभारण्यात येत आहे. जूनअखेर संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख यांच्या उपस्थितीत भिलवडी गटांतर्गत विविध गावांतील नेतेमंडळी व कार्यकर्ते जाहीर कार्यक्रमांतून भाजपध्ये प्रवेश करून कॉँग्रेसला रामराम करण्याच्या तयारीत आहेत.
निष्ठेचे चीज शून्य
आपण गेल्या पंचवीस वर्षांपासून कदम गटामध्ये सक्रिय असून, कामाचे कसलेच चीज होत नसल्याने कॉँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपपध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती भिलवडी ग्रामपंचायतीच्या एका माजी पदाधिकाऱ्याने दिली.