किरीट सोमय्या सोमवारी दुपारी घोरपडे कारखान्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:26 IST2021-09-18T04:26:57+5:302021-09-18T04:26:57+5:30
कोल्हापूर - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घोटाळ्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी दुपारी सरसेनापती संताजी घोरपडे साखर ...

किरीट सोमय्या सोमवारी दुपारी घोरपडे कारखान्यावर
कोल्हापूर - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात घोटाळ्याचा आरोप करणारे भाजप नेते किरीट सोमय्या सोमवारी दुपारी सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्यावर जाण्याची शक्यता आहे. मात्र याला अजूनही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. दरम्यान, ‘लोकमत’मधील किरीट सोमय्या कोल्हापुरात येणार असल्याच्या बातमीची शुक्रवारी दिवसभर चर्चा सुरू होती.
सोमय्या हे सकाळी महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापुरात येणार असून, ते अंबाबाईचे दर्शन घेण्याची शक्यता आहे. त्यानंतर ते जिल्हा पोलीस प्रमुखांचीही भेट घेणार असून, भाजपच्या शहर कार्यालयासही ते भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी १ च्या सुमारास ते घोरपडे कारखान्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. तेथून परत कोल्हापुरात येऊन पत्रकार परिषद घेऊन ते संध्याकाळी पुन्हा मुंबईला रवाना होणार आहेत.
चौकट
पोलीस रोखण्याची शक्यता
सोमय्या यांनी जरी मुश्रीफ यांच्या घाेरपडे यांच्या कारखा्न्यावर जाण्याचे नियोजन केले असले तरी त्या वेळच्या परिस्थितीचा अंदाज बांधून पोलीस त्यांना रोखण्याची शक्यता आहे. कारण कारखान्याकडे जाणारा रस्ता हा मुश्रीफ यांच्याच मतदारसंघातील विविध गावांतून जातो. या सर्व गावांमध्ये मोठ्या संख्येने मुश्रीफ समर्थक आहेत. सोमय्या यांच्या आरोपानंतर जिल्ह्यात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. यातून काही गैरप्रकार घडू नयेत यासाठी पोलीसच सोमय्या यांना कारखा्न्यावर जाण्यापासून रोखण्याची शक्यता आहे. त्यांच्या पत्रकार परिषदेसाठी शासकीय विश्रामगृहावरील शाहू महाराज सभागृहाची मागणी भाजपने केली होती. परंतु ती जिल्हा प्रशासनाने नाकारल्याचे सांगण्यात आले.