किरणोत्सव आजपासून
By Admin | Updated: November 9, 2014 01:09 IST2014-11-09T00:54:27+5:302014-11-09T01:09:16+5:30
पूर्वसंध्येला किरणांनी केला चरणस्पर्श

किरणोत्सव आजपासून
कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिरात उद्या, रविवारपासून किरणोत्सवाला प्रारंभ होत आहे. दरम्यान, किरणोत्सवाच्या पूर्वसंध्येला आज, शनिवारी किरणांनी सायंकाळी पाच वाजून ४४ मिनिटांनी अंबाबाईच्या मूर्तीचा चरणस्पर्श केला. गेल्या दोन दिवसांपासूनच्या चाचणीनुसार सूर्यकिरणांचा प्रवास किरणोत्सवाच्या दृष्टीने योग्य दिशेने सुरू असल्याने यंदा भाविकांना पूर्ण क्षमतेने होणारा किरणोत्सव अनुभवता येईल, अशी अपेक्षा आहे.
जानेवारी महिन्यात दाट धुके व सूर्यकिरणांची तीव्रता कमी असल्याने किरणोत्सव झाला नव्हता. तत्पूर्वी म्हणजे नोव्हेंबर २०१३ मध्ये तीन दिवस पूर्ण क्षमतेने किरणोत्सव होऊन किरणे अंबाबाईच्या चेहऱ्यापर्यंत गेली. त्या पार्श्वभूमीवर उद्यापासूनच्या या सोहळ्याबद्दल उत्सुकता आहे.
नोव्हेंबर महिन्यात जानेवारीच्या तुलनेत सूर्यकिरणांची प्रखरता अधिक असल्याने किरणोत्सव होण्याची शक्यता जास्त असते. अंबाबाईचा किरणोत्सव तीन दिवस असला तरी त्याआधीचा एक दिवस आणि नंतरचा एक दिवस अशा पाच दिवसांचे निरीक्षण केले जाते. गेल्या चार-पाच दिवसांपासून विवेकानंद महाविद्यालयाचे प्राध्यापक मिलिंद कारंजकर हे किरणोत्सवाचा अभ्यास करीत आहेत. त्यानुसार आज सायंकाळी गाभाऱ्यातील दिवे मालविले. प्रखर किरणांनी पाच वाजून ४४ मिनिटांनी देवीचा चरणस्पर्श केला आणि नंतर ती मूर्तीच्या डाव्या बाजूला सरकली. कारंजकर यांच्या मतानुसार ढग आडवे आले नाहीत तर उद्या किरणे मूर्तीच्या कमरेपर्यंत जाण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)