कोल्हापूर : कनाननगर येथून अपहरण झालेल्या दोन मुलांचा सोमवारी (दि. ४) हैदराबादमध्ये शोध लागला. भीमा मोहन कूचकोरवी (वय १२) आणि रुपाली नितीन खाडे (वय ११, दोघे रा. कानाननगर, कोल्हापूर) या दोघांची सुटका करून पोलिसांनी अपहरण करणारी महिला काजल सुधाकर सूर्यवंशी (वय ३५, रा. कनानानगर, कोल्हापूर) हिला अटक केली. काजल हिने भीक मागण्यासाठी २७ ऑगस्टला दोन्ही मुलांचे अपहरण केले होते.शाहूपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित अपहरणकर्ती महिला काजल सूर्यवंशी कनाननगर येथे राहत होती. स्टेशन रोडवर भीक मागून उदरनिर्वाह करणा-या महिलेने खाऊ देण्याचे आमिष दाखवून भीमा कुचकोरवी आणि रुपाली खाडे यांना फूस लावून २७ ऑगस्टला दुपारी रेल्वे स्टेशनला नेले. त्यानंतर तिघे रेल्वेने हैदराबादला गेले. तिथे रेल्वे स्टेशनसह परिसरात मुलांना भीक मागायला लावले. दिवसभरात भीक मागून मिळालेले पैसे ती मुलांकडून काढून घेत होती.
आई-वडिलांची आठवण येत असल्याने भीमा याने रविवारी (दि. ३) रेल्वे स्टेशनवर भेटलेल्या अब्दुल मुसा या व्यक्तीच्या मोबाइलवरून घरी फोन केला. या फोनमुळे मुले हैदराबादमध्ये असल्याचे समजले. पालकांनी तातडीने याची माहिती शाहूपुरी पोलिसांना दिली.स्थानिकाच्या मदतीने मुलांचा शोधअपहृत मुलांची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक प्रमोद चव्हाण, कॉन्स्टेबल लखन पाटील आणि विशाखा पाटील यांचे पथक तातडीने रविवारी हैदराबादकडे रवाना झाले. अब्दुल मुसा याच्या मदतीने सोमवारी हैदराबाद रेल्वे स्टेशन परिसरात अपहृत मुलांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी संशयित महिला काजल हिला अटक करून दोन्ही मुलांची सुटका केली.