अपहृत बालिका सांगलीत सापडली

By Admin | Updated: August 31, 2014 23:25 IST2014-08-31T23:25:32+5:302014-08-31T23:25:32+5:30

मुंबईतून पळविले : विजापूरच्या महिलेस अटक

The kidnapped child was found in Sangli | अपहृत बालिका सांगलीत सापडली

अपहृत बालिका सांगलीत सापडली

सांगली : तीन दिवसांपूर्वी मुंबईतून यास्मिन इस्माईल शेख या नऊ महिन्यांच्या चिमुरडीचे अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणाचा छडा आज, रविवार सांगलीत लागला. बालिका सुखरूप सापडल्याने मुंबईच्या गुन्हे अन्वेषण विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. तिचे अपहरण करणाऱ्या भाग्यश्री संतोष पाटील (वय ३५, रा. विजापूर, कर्नाटक) या महिलेस अटक करण्यात आली आहे. सायंकाळी या चिमुरडीची आई सलमा शेख व गुन्हे अन्वेषणचे पथक सांगलीत दाखल झाले होते. पथकाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे दिला. भाग्यश्रीला ताब्यात घेऊन पथक रात्री उशिरा मुंबईला रवाना झाले.
सलमा शेख या मुंबईतील गिरगावमध्ये मच्छी गल्लीतील पत्र्याच्या चाळीत राहतात. त्यांची मुलगी यास्मिन ही २९ आॅगस्टला घराजवळ खेळत होती. संशयित भाग्यश्रीही तिथेच राहते. दुपारी चार ते सायंकाळी सहा या वेळेत यास्मिनचे अपहरण झाले होते. सलमा यांनी तिचा शोध घेतला, मात्र ती कोठेच सापडली नव्हती. त्यामुळे रात्री उशिरा त्यांनी व्ही. पी. रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. गुन्हे अन्वेषण विभागानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. त्यावेळी त्यांना संशयित भाग्यश्रीही गायब असल्याचे समजले होते. त्यांनी यास्मिन व भाग्यश्रीचे छायाचित्र राज्यातील सर्व पोलीस ठाण्यांना पाठवून शोधाचे आदेश दिले होते. विश्रामबाग पोलिसांनाही हे छायाचित्र मिळाले होते. आज, रविवार सकाळी गोकुळनगरमध्ये एक महिला लहान मुलाला घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाली होती. पोलीस तिथे तातडीने रवाना झाले. त्यांच्याकडे असलेल्या फोटोवरून ही महिला भाग्यश्री पाटीलच असल्याचे समजले. तिच्यासोबत यास्मिनही होती. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले. भाग्यश्रीची कसून चौकशी करण्यात आली. वर्षांपूर्वी ती गोकुळनगरमध्ये राहत होती. त्यानंतर ती मुंबईला गेली होती. यास्मिनचे तिने का अपरहण केले, यासंदर्भात ती काहीही बोलत नाही. या कारवाईची माहिती मिळताच मुंबई गुन्हे अन्वेषण विभागाने सुटकेचा नि:श्वास सोडला. (प्रतिनिधी)

सोलापूर, पुणे, जेजुरी अन् सांगली
यास्मिनचे अपहरण केल्यानंतर भाग्यश्री मुंबईतून सोलापूरला गेली. त्यानंतर पुणे व जेजुरीलाही गेली होती. काल, शनिवार रात्री ती रेल्वेने सांगलीत आली. रेल्वे स्टेशनवरून थेट ती गोकुळनगरमध्ये गेली. रात्रभर तिने तिथेच मुक्काम ठोकला.

Web Title: The kidnapped child was found in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.