खानवलकर चषक ‘सांगावकर’कडे
By Admin | Updated: May 21, 2015 00:03 IST2015-05-20T23:26:57+5:302015-05-21T00:03:20+5:30
सहारा स्पोर्टस् पराभूत : अंशुमन देसाईच्या ३० धावा

खानवलकर चषक ‘सांगावकर’कडे
कोल्हापूर : अनिल सांगावकर क्रिकेट अकॅडमीने कै. अण्णा मोगणे सहारा स्पोर्टस्चा आठ गडी राखून पराभव करीत कै. विश्वनाथ खानवलकर १२ वर्षांखालील चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात अंशुमन देसाई याने ३० धावा केल्या.
शास्त्रीनगर मैदान येथे सांगावकर अकॅडमी व मोगणे सहारा स्पोर्टस यांच्यात अंतिम सामना झाला. प्रथम फलंदाजी करताना मोगणे सहारा संघाने ३० षटकांत ८ बाद ८९ धावा केल्या. यामध्ये अभिनंदन गायकवाडने नाबाद ३०, तर आदित्य मायदेवने १९ धावा केल्या. सांगावकर संघाकडून सक्षम नलवडे, अभिषेक निषाद, शुभम नलवडे, कपिल सांगावकर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
उत्तरादाखल सांगावकर संघाने हे आव्हान २३.४ षटकांत ३ बाद ९० धावा करीत सहज पार केले. यामध्ये अंशुमन देसाईने नाबाद ३०, तर विनायक कोळेकरने ११ धावा करीत विजयावर व अजिंक्यपदावर शिक्कामोर्तब केले. मोगणे सहाराकडून रचित चौगुले, कार्तिक केंकरे यांनाच प्रत्येकी एक बळी घेता आला.
विजयी संघ असा : प्रथमेश साठे (कर्णधार), तुषार पाटील, कपिल सांगावकर, रोहित माणगावकर, अंशुमन देसाई, सक्षम नलवडे, शुभम नलवडे, अभिषेक निषाद, विनायक कोळेकर, अभिजित निषाद, गौतम हर्षे.
आजपासून महिला क्रिकेट
विक्रमवीर भाऊसाहेब निंबाळकर निमंत्रित आंतरजिल्हा महिला क्रिकेट स्पर्धा आज, गुरुवारपासून शिवाजी स्टेडियम येथे सुरू होत आहे. पहिला सामना कोल्हापूर जिल्हा महिला संघ विरुद्ध सांगली जिल्हा महिला संघ यांच्यात होणार आहे.