खंडोबा तालीमची विजयी सलामी

By Admin | Updated: February 11, 2016 23:40 IST2016-02-11T23:39:40+5:302016-02-11T23:40:03+5:30

छत्रपती शहाजी महाराज वरिष्ठ गटाच्या फुटबॉल स्पर्धा

Khandoba Talimchi's winning salute | खंडोबा तालीमची विजयी सलामी

खंडोबा तालीमची विजयी सलामी

कोल्हापूर : दिलबहार तालीम मंडळातर्फे आयोजित छत्रपती शहाजी महाराज वरिष्ठ गटाच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये गुरुवारी खंडोबा तालीम फुटबॉल संघाने संध्यामठ तरुण मंडळावर ट्रायब्रेकरवर ३-१ अशा गोलफरकाने मात करीत विजयी सलामी दिली. शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल देशमुख यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी महापालिकेतील विरोधी पक्षनेते संभाजी जाधव, माजी नगरसेवक विनायक फाळके, रमेश पुरेकर, ‘केएसए’चे पदाधिकारी उपस्थित होते.
उद्घाटनचा सामना संध्यामठ तरुण मंडळ विरुद्ध खंडोबा तालीम फुटबॉल संघ यांच्यामध्ये झाला. प्रारंभापासून संध्यामठ तरुण मंडळाने आक्रमक खेळी करण्यास सुरुवात केली. १७ व्या मिनिटाला संध्यामठच्या अक्षय पाटीलने गोल नोंदवीत संघाला १-० अशी आघाडी घेतली. उत्तरार्धात ही आघाडी कमी करण्यासाठी खंडोबाच्या अजिज मोमीन, तुषार पाटील, सागर पोवार, ओमकार साळवी यांनीे प्रयत्न केले. मात्र त्यांच्या चढाया फोल ठरल्या.
सामन्याच्या ७८ व्या मिनिटाला खंडोबाच्या सिद्धार्थ शिंदे याने गोल नोंदवीत सामना १-१ अशा गोलफरकाने बरोबरीत केला. ही बरोबरी सामना संपेपर्यंत कायम राहिल्याने मुख्य पंचांनी सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेतला. यामध्ये खंडोबा तालीम संघाकडून सागर पोवार, रोहन पाटील, आशिष चव्हाण यांनी गोल केले; तर तुषार पाटीलने मारलेला चेंडू पोलला लागला. संध्यामठ तरुण मंडळाकडून आशिष पाटील, सिद्धेश यादव यांनी मारलेला चेंडू खंडोबा संघाचा गोलरक्षक निखिल दर्पण याने अडविला. रोहित साठेने गोल केला, तर मंगेश भालकरने मारलेला चेंडू बाहेर गेला. अशा प्रकारे खंडोबा तालीम मंडळाने सामन्यात ३-१ अशा गोलफरकाने विजय मिळविला.

Web Title: Khandoba Talimchi's winning salute