खंडोबा (ब) ची विजयी सलामी

By Admin | Updated: April 3, 2015 00:38 IST2015-04-03T00:06:42+5:302015-04-03T00:38:56+5:30

नेताजी चषक फुटबॉल स्पर्धा : गोल्डस्टार स्पोर्टस्, छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळाचा पराभव

Khandoba (B)'s winning salute | खंडोबा (ब) ची विजयी सलामी

खंडोबा (ब) ची विजयी सलामी

कोल्हापूर : गडहिंग्लज युनायटेड स्पोर्टस्ने गोल्डस्टार स्पोर्टस् असोसिएशनचा टायब्रेकरवर ४-३ असा, तर खंडोबा तालीम मंडळ(ब) ने छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळ(गडहिंग्लज) चा ७-० असा पराभव करीत नेताजी तरुण मंडळ आयोजित नेताजी चषक फुटबॉल स्पर्धेत विजयी सलामी दिली.शाहू स्टेडियम येथे गुरुवारी गडहिंग्लज युनायटेड स्पोर्टस् व गोल्डस्टार स्पोर्टस् यांच्यात सामना झाला. सामन्याच्या प्रारंभापासून गडहिंग्लज संघाच्या ओमकार जाधव, समीर किल्लेदार, अमित सावंत यांनी खोलवर चढाया केल्या. २८ व्या मिनिटास गडहिंग्लज संघाच्या संदीप गोंधळी याने अमित सावंतच्या पासवर मैदानी गोल नोंदवत सामन्यात १-० अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात ‘गोल्डस्टार’कडून प्रथमेश हेरेकर याने ४८ व्या मिनिटात गोल नोंदवत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. शेवटपर्यंत सामन्यात १-१ बरोबरी राहिल्याने सामन्याचा निकाल टायब्रेकरवर घेण्यात आला. यात ‘गडहिंग्लज’कडून अमित सावंत, संदीप घेवडे, सूरज तेली, ओंकार गोसावी यांनील तर ‘गोल्डस्टार’कडून अकिल पाटील, प्रथमेश हेरेकर, अक्षय चेचर यांनी गोल केले. त्यामुळे सामना गडहिंग्लज संघाने ४-३ असा जिंकला.दुसरा सामना खंडोबा (ब) व छत्रपती संभाजीराजे तरुण मंडळ (गडहिंग्लज) यांच्यात झाला. सामन्याच्या प्रारंभापासून खंडोबा संघाने वर्चस्व ठेवले. १२ व्या मिनिटास ‘खंडोबा’कडून विशाल सासने याने गोल नोंदवत संघाचे खाते उघडले. पुन्हा खंडोबाकडून १५ व्या मिनिटास विद्याधर मोरे याने गोल नोंदवला. सामन्यात २-० अशी आघाडी घेतली. ३१ व्या मिनिटास विशाल सासनेने वैयक्तिक दुसरा व संघाचा तिसरा गोल नोंदवला.
उत्तरार्धातही खंडोबा संघाचेच वर्चस्व होते. ३७ व ५० व्या मिनिटास खंडोबाच्या अजिज मोमीन याने संघाचा चौथा व पाचव्या गोलची नोंद केली. ५५ व्या मिनिटास भूषण पेठे याने, तर ६१ व्या मिनिटास निखील जाधव यांनी खंडोबाकडून अनुक्रमे सहाव्या व सातव्या गोलची नोंद करीत सामना जिंकला.स्पर्धेचे उद्घाटन शिवछत्रपती गु्रपचे प्रमोद पाटील यांनी केले. यावेळी चंद्रकांत जाधव, अभय देशपांडे, रामभाऊ चव्हाण, नगरसेवक शारंगधर देशमुख, नगरसेवक सचिन चव्हाण, माजी नगरसेवक अजित राऊत, बबनराव कोराणे, राजेंद्र साळोखे, राजेंद्र राऊत, विजय साळोखे, प्रदीप साळोखे, अभिजित गायकवाड, लालासाहेब गायकवाड आदी उपस्थित होते.

Web Title: Khandoba (B)'s winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.