खंडाळ्यात गुरू-शिष्यामध्ये लढत

By Admin | Updated: April 27, 2015 00:18 IST2015-04-26T23:45:40+5:302015-04-27T00:18:16+5:30

जिल्हा बँक निवडणूक : माघार घेतलेल्या उमेदवारांच्या हाती विजयाची चावी

In the Khandal, fighting between the Guru and the disciples | खंडाळ्यात गुरू-शिष्यामध्ये लढत

खंडाळ्यात गुरू-शिष्यामध्ये लढत

शरद ननावरे - खंडाळा  -- जिल्हा बँक निवडणुकीत खंडाळा सोसायटी मतदार संघातून तिकीट वाटपावरून राष्ट्रवादीअंतर्गत बंडाळी झाली आहे. त्यामुळे या निवडणुकीत पक्षांतर्गतच लढत पाहायला मिळणार आहे. नाराज उमेदवारांची नाराजी काढण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मेहनत घ्यावी लागणार आहे. उमेदवारी देण्यावरून झालेल्या वादंगानंतर खंडाळ्यातून राजकीय गुरू-शिष्यच निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. मात्र त्यांच्या विजयाच्या चाव्या मात्र माघार घ्यावी लागलेल्या उमेदवारांच्याच हाती आहेत. त्यामुळे कोण कोणाच्या पारड्यात वजन टाकणार यावरच बँकेचे दरवाजे उघडले जाणार आहेत.
राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे निकटवर्तीय दत्तानाना ढमाळ यांनाच पुन्हा संधी दिल्याने ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील यांनी उघडपणे बंडाचा झेंडा हाती घेतला आहे. तर आपली नाराजी व्यक्त करून केवळ पक्षाचा विचार करून माघार घेणारे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे-पाटील यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.
माघारीची वेळ निघून गेल्याने अर्ज राहिलेले जिल्हा परिषद सदस्य आनंदराव शेळके-पाटील हे आपल्याबरोबर असल्याचे आमदार मकरंद पाटील यांनी जाहीर केले असले तरी त्यांनी स्वत: कोणतीही भूमिका स्पष्ट केली नाही. तर समन्वय समितीचे अध्यक्ष शामराव गाढवे यांचीही भूमिका गुलदस्त्यात आहे, त्यामुळे निवडणुकीत मोठी रंगत येणार आहे.
खंडाळा सोसायटी गटात ५१ मतदार आहेत. यापैकी राष्ट्रवादीचे प्राबल्य मोठे आहे; मात्र ते अंतर्गत नेत्यांमध्ये विभागले गेले असल्याने उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. विद्यमान संचालकांना पुन्हा संधी दिल्याने इतर प्रबळ दावेदार नाराज झाले आहेत.
खंडाळा साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादीने मोठी मदत केली होती. त्याबदल्यात बँकेतून काँग्रेसच्या उमेदवारांनी माघार घ्यावी, हा दिलेला शब्द शंकरराव गाढवे यांनी पाळला असला तरी प्रत्यक्षात काँग्रेसचे मतदार कोणाच्या पाठीशी राहणार, हे स्पष्ट नाही. प्रामाणिकपणा आणि पक्षनिष्ठा याच्या जोरावर दत्तानाना ढमाळ यांनी उमेदवारीत बाजी मारली असली तरी बंडोबांना थंड केल्याखेरीज अथवा नाराजांची मर्जी संपादन
केल्याखेरीज विजयी वाट धरता येणार नाही.
सोसायटी मतदारांमध्ये सर्वाधिक मते नितीन भरगुडे-पाटील यांच्याकडे असल्याने त्यांचाच निर्णय निर्णायक ठरणार आहे. मात्र आपल्याकडे क्षमता असतानाही पक्षाकडून वारंवार डावलले जाते याची सल त्यांच्या मनात आहे.



निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष..
काँग्रेसचे अजय धायगुडे-पाटील हे भटक्या विमुक्त गटातून राष्ट्रवादी विरोधात लढत देत आहेत. त्यामुळे ते सोसायटी मतदारसंघात कोणाला मदत करणार? नितीन भरगुडे-पाटलांचे समर्थक राजेंद्र नेवसे यांचाही इतर मागास प्रवर्गातून अर्ज राहिला असल्याने पक्ष काय भूमिका घेणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

Web Title: In the Khandal, fighting between the Guru and the disciples

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.