धामोड : खामकरवाडी-अवचितवाडी दरम्यान आसलेला खामकरवडी लघू पाटबंधारे प्रकल्प शनिवारी पूर्णक्षमतेने भरला. त्यामुळे धरणाच्या उजव्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे. हे पाणी तुळशी नदीपात्रात मिसळल्याने नदी पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.गेल्या आठवडाभरापासून परिसरात पावसाची रिपरिप चांगलीच वाढली आहे. त्यामुळे तलाव व छोट्या-मोठ्या प्रकल्पाच्या पाणी पातळीत मोठी वाढ होत आहे. गतसालापेक्षा यावर्षी पाऊसही सरासरीपेक्षा चांगलाच असल्याने जिल्ह्यातील प्रकल्प भरतील, अशी अपेक्षा शेतकरी बाळगून आहेत. आर्द्राच्या पावसाने दमदार एंट्री केल्याने शेतकरी वर्ग सुखावला असून, रोप लागणीची कामे सुरू करण्याच्या तयारीत इथला बळीराजा आहे.खामकरवाडी प्रकल्प खामकरवाडी व अवचितवाडी या दोन गावांसाठी वरदान आहे. प्रकल्प यावर्षी लवकरच कोरडा पडल्याने शेती सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तीव्र बनला होता. पण मागील आठवडाभर पावसाची संततधार सुरू झाल्याने कोरडा पडलेला प्रकल्प मध्यरात्री पूर्णक्षमतेने भरला. या प्रकल्पात ११६२.७८ सहस्र घनमीटर इतका पाणीसाठा होतो. प्रकल्प पूर्णक्षमतेने भरल्याने शेतकरी वर्गातून मोठे समाधान व्यक्त होत आहे.
Kolhapur: खामकरवाडी पाझर तलाव 'ओव्हर फ्लो', तुळशी नदी पाणीपातळीत वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 12:52 IST