‘टेन्शन फ्री’ हाेण्यासाठी खाकी वर्दीनेही जोपासले छंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:24 IST2021-05-11T04:24:32+5:302021-05-11T04:24:32+5:30
कोल्हापूर : पोलिसांची नोकरी म्हणजे एक पाय उंबऱ्यावर तर एक पाय उंबऱ्याबाहेर अशी नोकरी म्हटले तर वावगे ठरणार नाही. ...

‘टेन्शन फ्री’ हाेण्यासाठी खाकी वर्दीनेही जोपासले छंद
कोल्हापूर : पोलिसांची नोकरी म्हणजे एक पाय उंबऱ्यावर तर एक पाय उंबऱ्याबाहेर अशी नोकरी म्हटले तर वावगे ठरणार नाही. मंत्री, नेत्यांचे दौरे, पेट्रोलिग, छापा, कुठे मारामारी, मारामारीत मयत झालेल्या मृताचा पंचनामा करणे, तर कुठे दंगल झाली की कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तोंड द्यायला पोलीस कर्मचारीच आधी उपस्थितीत राहतात. अशी जिकिरीची कामे तर पोलिसांची नित्याचीच बाब बनली आहे. त्यात गेल्या वर्षीपासून कोरोना संसर्गापासून रोखण्यासाठी रस्त्यावरील गर्दी कमी करण्याचे काम अशा २४ बाय ७ च्या ड्युटीतही ताणतणाव हलका करण्यासाठी पोलीस दलातील कर्मचारी आपला छंद वेळ मिळेल तसा जोपासत आहेत.
अनेकजण आपल्या आवाजाच्या जादुतून कुटुंबासह सहकाऱ्यांसोबत आपलाही ताण कमी करतात. काहीजण मोटारसायकलवरून रायडिंग करतात. काही तर स्वत: वाद्ये वाजवून आनंदात रममाण होतात आणि इतरांना त्याप्रमाणे तहान भूक हरवून रममान व्हायला भाग पाडतात. काहीजणांना हिपाॅपसारख्या आधुनिक नृत्य प्रकाराचे सादरीकरणात आनंद लुटतात. इतर सहकाऱ्यांना आपल्याप्रमाणे नृत्यासही भाग पाडून तणावापासून काहीकाळ दूर ठेवण्याचा प्रयत्न करतात.
खंडागळेचे गाणे मंत्रमुग्ध करणारे
पोलीस मुख्यालयात अधीक्षकांच्या चेंबरला काम करणारे सचिन खंडागळे यांना महाविद्यालयीन जीवनापासून किशोरकुमार, महमद रफी, उदित नारायण, आदींची गाणी गायनाचा छंद आहे. अनेक स्टेज शोमध्ये त्यांनी गायन केले आहे. एव्हरग्रीन गायक म्हणून कोल्हापूर पोलीस दलात त्याचे नाव आहे. कर्तव्य संपल्यानंतर अर्धा तास ते खास गायनासाठी राखून ठेवतात. खंडागळे यांचे गाणे इतर सहकाऱ्यांनाही काहीकाळ मंत्रमुग्ध करते.
फोटो : १००५२०२१-कोल-सचिन खंडागळे
अश्विनींचा सॅक्सोफोन वाजण्याचा छंद तर स्तब्ध करणारा
पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक म्हणून काम करणाऱ्या अश्विनी आप्पासाहेब पाटील यांना महाविद्यालयीन जीवनापासून गायन, वादनाचा छंद आहे. त्यात त्या सॅक्सोफोन वाजविण्यात माहीर आहेत. तेरा वर्षे पोलीस ठाण्यांमध्ये कर्तव्य बजावल्यानंतर त्यांनी छंद म्हणून जोपासलेला सॅक्सोफोन वादकामुळे बॅंड पथकात दाखल होणाऱ्या राज्यातील पहिल्या महिला वादक म्हणून रुजू होण्याचा मान मिळाला. बंदोबस्त आटपून त्या मिळेल त्या वेळी सॅक्सोफोन वाजण्याच्या आनंद लुटतात. मुख्यालयातील अनेक स्त्री-पुरुष सहकारी हा त्यांचा वाजविण्याचा आविष्कार कानात साठवून ठेवण्यासाठी आतुर असतात.
फोटो : १००५२०२१-कोल-अश्विनी पाटील
संदीप यांचा हरहुन्नरीपणा इतरांसाठी प्रेरणादायी
शाहूपुरी पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून काम करणारे संदीप जाधव हे हरहुन्नरी कलाकार व राष्ट्रीय हाॅकीपटू म्हणून पोलीस दलात प्रसिद्ध आहेत. कर्तव्यातून वेळ मिळेल तेव्हा व्यावसायिक पद्धतीने मोटरसायकल रायडिंगचा छंद आहे. याशिवाय नव्या जुन्या गाण्यांचा त्यांना छंद आहे. या सर्वाबरोबर त्यांना वेगवेगळ्या खेळांसाठी पंच वापरतात ती शिट्टी जमविण्याचा छंद आहे. त्यांच्याकडे देश परदेशातील शेकडो प्रकारच्या व्हिसल अर्थात शिट्या आहेत. हा छंद ते कर्तव्य बजावून मिळेल त्या वेळात जोपासतात.
फोटो : १००५२०२१-कोल-संदीप जाधव
पोलीस दलातील मायकेल जॅक्सन अर्थात दया भोसले
पोलिस मुख्यालयात पोलीस हवालदार म्हणून कार्यरत असणारे दया भोसले यांना शालेय जीवनापासून नृत्याची आवड आहे. विशेषत: गोविंदा, मायकेल जॅक्सन, जावेद जाफरी यांचे चित्रफिती पाहून नृत्याविष्कार अवगत केला. त्यातून अनेक स्टेज शोही केले. १९९६ पासून पोलीस दलात लागल्यापासून अनेक वेळा पोलीस कल्याण निधी च्या कार्यक्रमात हुबेहुब मायकेल जॅक्सन, गोविंदा यांचे नृत्यविष्कार सादर केले. अभिनेता गोविंदा यांच्याबरोबर नृत्य करण्याची संधीही त्यांना मिळाली. सोशल मीडियावरून कोरोनापासून बचावासाठी ही ते नृत्यातून संदेश देत आहेत. पोलीस दलाबरोबर ते प्रबोधन करणारे मायकेल जॅक्सन म्हणून सर्वत्र परिचित आहेत. वेळ मिळेल तेव्हा ते नृत्याचा सराव करतात.
फोटो : १००५२०२१-कोल-दया भोसले०१, ०२, ०३
पोलीस दलातील कर्मचारी संख्या - २७६२
अधिकारी - १५९
पोलीस ठाणे संख्या - ३०
दूरक्षेत्र चौकी - ३१
ग्रामपंचायती- १०२८
गावे -१०३९