निविदा मंजुरीवरून सभेत खडाजंगी कागल नगरपालिका सभा
By Admin | Updated: August 9, 2014 00:33 IST2014-08-08T23:17:04+5:302014-08-09T00:33:59+5:30
सत्तारूढ-विरोधकांत जोरदार चर्चा

निविदा मंजुरीवरून सभेत खडाजंगी कागल नगरपालिका सभा
कागल : नगरपरिषदेच्यावतीने विविध विकासकामांच्या वेळोवेळी वर्तमानपत्रांतून प्रसिद्ध केलेल्या निविदा यांची माहिती जाणीवपूर्वक लपविली जात असल्याचा आरोप करीत विरोधी नगरसेवकांना या विकासकामांच्या निविदांना मंजुरी देण्यास तीव्र विरोध केला, तर सत्ताधारी गटाने हा आरोप धुडकावून लावीत विषयास मंजुरी दिली. पाझर तलाव सुशोभीकरण, अपंग निधी खर्च, दुकानगाळे वितरण, बहुउद्देशीय आजी-माजी सैनिक सभागृह, आदी विषयांवर सभागृहात जोरदार चर्चा झाली; तर माजी सैनिक गृहनिर्माण जागेबद्दल माजी सैनिकांनी सभागृहात येऊन विचारणा केली. सभेच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्षा उषाताई सोनुले होत्या. मुख्याधिकारी प्रभाकर पत्की पीठासनावर होते. विषयपत्रिकेवर तब्बल ४८ विषय होते. विषय क्र. २४ मध्ये विकासकामांच्या निविदांना मंजुरी देण्याच्या विषयावर भैया इंगळे आणि संजय कदम यांनी आक्षेप घेतला. कागलमध्ये एकही अंक न येणाऱ्या दैनिकात जाहिरात देण्यामागचा उद्देश काय? निविदा उघडल्या नसताना विषय पटलावर का ठेवला आहे? अशी विचारणा करून हा विषय स्थगित ठेवावा, अशी मागणी केली. पक्षप्रतोद रमेश माळी यांनी ‘ई-टेंडरमध्ये माहिती लपविण्याचा प्रश्नच नाही. निविदा ज्या दैनिकात दिल्या ते दैनिक रोज कागलमध्ये येते,’ असे स्पष्ट करून सभागृह या विषयाला मंजुरी देत असल्याचे जाहीर केले. विरोधी नगरसेवकांनी या विषयासाठी उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. पाझर तलावाच्या सुशोभीकरणाचा कागलच्या जनतेला काय फायदा, असा प्रश्न भैया इंगळे यांनी विचारला. त्यावर अजित कांबळे यांनी या प्रश्नाचे उत्तर कागलच्या जनतेकडेच आहे, असे सांगितले. दुकानगाळे वितरणाबद्दल मारुती मदारे, प्रवीण गुरव यांनी काही प्रश्न उपस्थित केले. विषय क्र. २७ च्या आजी-माजी सैनिकांसाठी बहुउद्देशीय सैनिक हॉल बांधकामाबद्दल झालेल्या चर्चेच्या वेळी माजी सैनिक अनंत अथणे व अन्य सदस्यांनी सभागृहातच आपल्या मागण्यांबद्दल जाब विचारला. सैनिक स्मृती स्तंभ, तसेच सैनिकांच्या गृहनिर्माण संस्थेच्या जागेचे काय झाले? असा प्रश्न केला. रमेश माळी यांनी सैनिकांसाठी हे सभागृह असेल, असे स्पष्ट केले. चर्चेत संजय चितारी, मनोहर पाटील, नम्रता कुलकर्णी, राजू डावरे, संगीता गाडेकर, आदींनी भाग घेतला.