गरजेइतकेच कमवावे, हीच आरोग्याची गुरुकिल्ली
By Admin | Updated: May 1, 2015 00:14 IST2015-04-30T23:53:35+5:302015-05-01T00:14:39+5:30
धनंजय गुंडे : ‘लोकमत’ इचलकरंजी वर्धापनदिनानिमित्त आयोजन

गरजेइतकेच कमवावे, हीच आरोग्याची गुरुकिल्ली
इचलकरंजी : स्वत:च्या आवश्यकतेपेक्षा जादा द्रव्याचा संचय करणे म्हणजे अनेक प्रकारच्या व्याधी लावून घेणे. त्यातूनच पुढे मधुमेह, उच्च रक्तदाब यासारखे जीवघेणे आजार उत्पन्न होतात. म्हणून आपल्या जीवनात शिस्त लावून घेऊन आपल्या आवश्यकइतकेच कमवावे, हीच उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आहे, असे मत ज्येष्ठ योगतज्ज्ञ डॉ. धनंजय गुंडे यांनी व्यक्त केले.
‘लोकमत’च्या इचलकरंजी विभागीय कार्यालयाच्या वर्धापनदिनानिमित्त डॉ. धनंजय गुंडे यांचे ‘उत्तम आरोग्यासाठी जीवनशैली’ या विषयावर व्याख्यान झाले. सुमारे दीड तासाच्या शैलीदार भाषणात त्यांनी श्रोत्यांना खिळवून ठेवले. श्रोत्यांना प्रश्न-उत्तरे करीत आणि हसत-खेळत त्यांनी दिलेले प्रबोधनाचे व्याख्यान सर्वांना भावले.
डॉ. गुंडे म्हणाले, जीवनात शिस्त हवी. तसेच नियोजनही केले पाहिजे. स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे. त्यातूनच सर्व व्याधींना सुरुवात होते. त्यामुळे आवश्यक गरजेपुरते कमवा आणि त्यानंतर चिंताविरहित जीवन जगा, हेच सूत्र आपल्या जीवनात कायम ठेवा. त्यामुळे तुम्हाला कधीही निराश व्हावे लागणार नाही.
सध्या वाहिन्यांचे मायाजाल सुरू आहे. या वाहिन्यांवरील मालिकाही आपले जीवन बिघडवू शकतात. त्यामुळे लहान व किशोरवयीन मुलांना अशा मालिकांपासून लांब ठेवणे गरजेचे आहे. तसेच स्त्रियांनीही तथाकथित कौटुंबिक व स्त्री प्रधान असे म्हणविणाऱ्या मालिकांपासून दूर राहिले पाहिजे. कारण त्यामध्ये स्त्री ही पाताळयंत्री असते, असे सर्रास भासविले जाते. आपल्या परंपरागत संस्कारातूनच मुलांची जडणघडण झाली पाहिजे. त्यामुळे परस्परांवरील असलेले नातेसंबंध आणि माणसा-माणसांतील आवडी-निवडी जपल्या जातात आणि कुटुंब सुसंस्कृत बनते, असेही डॉ. गुंडे यांनी स्पष्ट केले.
संपादक वसंत भोसले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सपना मेळवंकी यांनी सूत्रसंचालन केले.
यावेळी ‘लोकमत’चे सरव्यवस्थापक मकरंद देशमुख, सहायक जाहिरात व्यवस्थापक श्रीराम जोशी, ज्येष्ठ उद्योजक मदनलाल बोहरा, गुंडोपंत रोजे-चौगुले, शशिकला बोरा, आदींसह श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जीवनात शिस्त महत्त्वाची असून, दैनंदिन नियोजनही केले पाहिजे.
स्वत:ला व स्वत:च्या कुटुंबाला पुरेलइतकेच कमविले पाहिजे. त्यापेक्षा जादा कमविले तर चिंता जडते आणि चिंता ही सर्व विकाराचे मूळ आहे.
गरजेपुरते कमवा आणि चिंताविरहित जीवन जगा.
नातेसंबंध जपले पाहिजेत.