लोकसहभागामुळेच केनवडे शाळेला ‘आयएसओ’
By Admin | Updated: February 29, 2016 00:55 IST2016-02-29T00:37:34+5:302016-02-29T00:55:30+5:30
विविध उपक्रम : शिक्षक, विद्यार्थी यांच्या चिकाटीमुळे मिळाला बहुमान

लोकसहभागामुळेच केनवडे शाळेला ‘आयएसओ’
दत्तात्रय पाटील-- म्हाकवे --केनवडे (ता. कागल) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेतील शिक्षकांची चिकाटी, विद्यार्थ्यांची कसोटी, शाळा व्यवस्थापन समिती ग्रामस्थांचे सहकार्य आणि शिक्षणप्रेमी संस्था, व्यक्ती यांच्या समन्वयातून या शाळेने जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट शाळेचा बहुमान पटकावत आयएसओ मानांकनचा बहुमान मिळविला आहे.गेल्या वर्षभरातून केंद्रप्रमुखपद रिक्त असतानाही आणि या केंद्रातील ११ प्राथमिक आणि तीन माध्यमिक शाळांची जबाबदारी पेलत या शाळेने घेतलेली भरारी उल्लेखनीय आहे. गुणवत्तेचा अव्वल दर्जा राखत लोकसहभागातून बोलका व्हरांडा, स्वच्छतागृहे, शाळेची आंतरबाह्य रंगरंगोटी, आदी कामांवरही भर दिला आहे. तसेच ई-लर्निंग सुविधा, शाळेतील सर्वच २५0 मुलांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी अॅक्वा वॉटर फिल्टरची सोय, सर्वांना दप्तर, प्रत्येक वर्गात ईनव्हर्टरची सोय ही करण्यात आली आहे.पहिली ते सातवीपर्यंतचे वर्ग असणारी ही शाळा समूहगीत स्पर्धेत जिल्ह्यात प्रथम, तर गुणवत्ता विकासमध्ये तालुक्यात द्वितीय आली आहे. तसेच ज्ञानरचनावादी शाळा, इंग्रजीवर भर, सामान्य ज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजूषा, वक्तृत्व स्पर्धा यातून मुलांची सर्वांग सुंदर अशी प्रगती साधली आहे. यासाठी सरपंच चंद्रभागा मगदूम, उपसरपंच सुवर्णा पाटील, अशोक मगदूम, दादासो तेली, गटविकास अधिकारी आबासाहेब पवार, गटशिक्षणाधिकारी चंद्रकांत बोडरे, विस्ताराधिकारी आर. एस. गावडे, कें द्रप्रमुख सतीश पाटील आदींचे सदस्यांचे मार्गदर्शन लाभले.
नावीन्यता उपस्थिती ध्वज अन् पाणी बचतीची !
अद्ययावत ग्रंथालय, प्रयोगशाळा, व्यासपीठ, बगीचा याबरोबरच या शाळेने पाणी बचतीसाठी बागेलाही ठिबकद्वारे पाणी दिले आहे. तसेच शीतपेयांच्या टाकावू बाटल्यांना लहान छिद्र पाडून ते प्रत्येक झाडाजवळ ठेवले आहे. तसेच विद्यार्थ्यांची शाळेत १00 टक्के उपस्थिती राहावी, यासाठी ज्या वर्गातील सर्व मुले उपस्थित आहेत त्या वर्गाला ध्वज दिला जातो. तो ध्वज दिवसभर त्या वर्गासमोर लावला जातो. त्यामुळे उपस्थितीबाबत सर्वच वर्गांची सतर्कता असते. उत्कृष्ट सेंद्रिय खत निर्मितीचाही प्रकल्प राबविला आहे.
आता राज्य परीक्षेतही यशाची स्वप्ने
‘नॅक’च्या धर्तीवर राज्यातील पहिल्या ४२ शाळांचे मूल्यमापन केले जाणार आहे. जिल्ह्यातून प्राथमिक शिक्षण विभागामार्फत गलगले बरोबरच केनवडे शाळेची निवड झाली आहे. हे मूल्यमापन विविध ४३ निकर्षांद्वारे केले जाणार असून, यामध्येही आम्ही यशस्वी होऊ, असा निर्धारही केनवडे शाळेतील सर्व शिक्षकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला आहे.