सर्वसामान्यांचा चेहरा बनून कार्यरत रहा
By Admin | Updated: August 2, 2015 23:37 IST2015-08-02T23:37:43+5:302015-08-02T23:37:43+5:30
बाबूराव गुरव : ‘शेकाप’च्या युवक कार्यकर्त्यांचे शिबिर

सर्वसामान्यांचा चेहरा बनून कार्यरत रहा
कोल्हापूर : सर्वसामान्यांत मिसळा, त्यांचा चेहरा बनून कार्यरत रहा. सर्वसामान्यांचे राज्य आणण्यासह पक्षाला मोठे करा, म्हणजे तुम्ही आपोआप मोठे व्हाल, असा मूलमंत्र प्रा. डॉ. बाबूराव गुरव यांनी रविवारी येथे युवक कार्यकर्त्यांना दिला.
स्वातंत्र्यसैनिक के. ब. जगदाळे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय शेतकरी कामगार पक्षातर्फे आयोजित इंदिरासागर हॉलमध्ये युवक कार्यकर्ता प्रबोधन शिबिरात ते बोलत होते. ‘शेकाप’चे मध्यवर्ती समिती सदस्य भारत पाटील अध्यक्षस्थानी, तर माजी आमदार संपतराव पवार-पाटील प्रमुख उपस्थित होते.
प्रा. गुरव म्हणाले, सध्या अनेक कार्यकर्त्यांना राजकारणात ‘हाय जंप’ घेण्याची घाई लागली आहे. ज्यांना अशी घाई असेल, त्यांनी इतर पक्षांकडे जावे. तयार व्हायचे येथे आणि जायचे दुसरीकडे हे बंद व्हावे. व्यक्तिगत स्वार्थासाठी फुटणार नाही, हे निश्चित करा. जनता जशी आहे, तसे कार्यकर्त्यांनी राहावे. शेकापची पुन्हा ताकद वाढत आहे. मात्र, आपण किती चांगले काम करणार, हे त्याचे यशात रूपांतर करण्यासाठी महत्त्वाचे ठरणारे आहे. पक्षाला नव्या पिढीची गरज आहे.
माजी आमदार पवार-पाटील म्हणाले, सरकारची सध्याची भूमिका बघता शेतकऱ्यांचे प्रश्न यापुढे बिकट होणार आहेत. याबाबत जुन्या मंडळींना वयामुळे काम करताना मर्यादा येणार आहेत. त्यामुळे युवा कार्यकर्त्यांनी पुढे यावे. त्यांनी तालुका पातळीवर फळी निर्माण करून ऊसदराबाबत आंदोलन उभारावे. शासकीय योजनांचा फायदा पात्र लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी कार्यरत राहावे.
भारत पाटील म्हणाले, आपल्या पक्षाचा विचार समाज उभारणारा आहे. त्याचे भान ठेवून युवा कार्यकर्त्यांनी पक्षात काम करावे. मेळाव्यास बाबूराव कदम, संभाजीराव जगदाळे, सुनंदा मोरे, आदी उपस्थित होते.
पहिल्या सत्रात माजी प्राचार्य विलास पोवार, डॉ. प्रकाश कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यानंतर जिल्ह्यातील विविध ग्रामपंचायतींत निवडून आलेल्या पक्षाच्या महिला-पुरुष कार्यकर्त्यांचा सत्कार झाला.
यावेळी केरबा पाटील, संभाजी पाटील, एकनाथ पाटील, अंबाजी पाटील, बाबूराव कदम, सुनंदा मोरे, संभाजीराव जगदाळे, आदींसह जिल्ह्यातील सुमारे चारशे युवा कार्यकर्ते उपस्थित होते. सागर वासकर यांनी स्वागत केले. अजित सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले. बाबासाहेब देवकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
कार्यकर्त्यांनो,
बिल्ला लावा...
‘शेकाप’चा बिल्ला हा चारित्र्याचा, प्रामाणिकपणाचा, कष्ट व सामान्य माणसांसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्याचा आहे. ते लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनो, आपल्या खिशाला पक्षाचा बिल्ला लावा. ती आपली ओळख बनवा, असे आवाहन प्रा. गुरव यांनी केले. याशिवाय पक्षाचे असे नवीन बिल्ले करण्याची सूचना माजी आमदार संपतराव पवार-पाटील यांना गुरव यांनी केली.