ठेकेदारांवर त्रयस्थ संस्थेमार्फत ‘वॉच’ ठेवा
By Admin | Updated: July 16, 2014 01:02 IST2014-07-16T00:55:47+5:302014-07-16T01:02:23+5:30
अजित पवार यांचे आदेश : आढावा बैठकीत प्रलंबित निधी; प्रकल्प आठवड्यात मार्गी लावण्याचे आदेश

ठेकेदारांवर त्रयस्थ संस्थेमार्फत ‘वॉच’ ठेवा
कोल्हापूर : राज्य शासन कोट्यवधींचा निधी देते. वरिष्ठ अधिकारी वर्षातून एकदा प्रकल्पावर भेटी देतात. कनिष्ठ अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे उद्योग करतात. जिल्हा नियोजन निधीतून दोन-तीन कोटींच्या निधीची तरतूद करून त्रयस्थ संस्थेमार्फत ठेकेदारांवर लक्ष ठेवून निविदेप्रमाणे कामे होत आहेत का, याचा आढावा घ्या, असे स्पष्ट आदेश आज, मंगळवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथील आढावा बैठकीत दिले. त्यासाठी टाटा कन्सल्टन्सी अथवा सांगलीच्या वालचंद महाविद्यालयातील तज्ज्ञांची समितीही नेमली जावी, अशी सूचना त्यांनी केली.
राष्ट्रवादीच्या निर्धार मेळाव्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या अजित पवार यांनी विविध शासकीय विभागांची आढावा बैठक शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहात घेतली. बैठकीसाठी जलसंपदा मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, महापौर सुनीता राऊत, आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार आदींसह सर्व विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होेते.
अजित पवार म्हणाले, जिल्ह्यातील राज्य शासनाक डे प्रलंबित विषय व निधीबाबत तत्काळ यादी व माहिती पाठवून द्या, सचिव स्तरावर तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावले जातील. जिल्ह्यात मनरेगा कामावर जाणाऱ्यांची संख्या कमी होत आहे, हे शुभसंकेत आहेत. पवार यांच्या धडाक्याने व सादरीकरणातील सर्व गोष्टी बारकाईने पाहण्याच्या पद्धतीने अधिकाऱ्यांना अक्षरश: घाम फुटला. सादरीकरणातील काना-मात्राही पवारांच्या नजरेतून सुटला नाही.