एकजूट ठेवा, यश नक्की मिळणार
By Admin | Updated: August 24, 2015 00:24 IST2015-08-24T00:24:35+5:302015-08-24T00:24:35+5:30
विनायक राऊत यांचे आवाहन : शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन

एकजूट ठेवा, यश नक्की मिळणार
कोल्हापूर : महापालिका निवडणुकीत विजय आपल्या हातात आहे. त्यामुळे एकजूट ठेवा, मतभेद विसरून कोल्हापूरकरांचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी निवडणुकीच्या तयारी लागा, असे आवाहन शिवसेना सचिव व खासदार विनायक राऊत यांनी शिवसैनिकांना रविवारी येथे केले.
महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, तर आमदार राजेश क्षीरसागर, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार वैभव नाईक, सहसंपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे प्रमुख उपस्थित होते.
खासदार राऊत म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीने विकासाऐवजी स्वत:ची तुंबडी भरली आहेत. त्यांना कोल्हापूरकर यावेळी मूठमाती देतील. विधानसभेचे प्रत्यंतर महापालिकेच्या निवडणुकीत होणार आहे. शहराचा विकास आणि कोल्हापूरकरांसाठी शिवसेना निवडणूक लढवत आहे. त्यामुळे एकजूट ठेवून, मतभेद विसरून कार्यरत राहा. धनुष्यबाणाच्या विजयासाठी झटा.
आमदार क्षीरसागर म्हणाले, शहराच्या विकासासाठी शिवसेना एकहाती निवडणूक लढविणार आहे. टोल धाड, कचरा उठाव, शुद्ध पाणी आदी शहरवासीयांच्या प्रश्नांसाठी सेनेने लढा दिला आहे. आपली ताकद मोठी आहे. प्रत्येक प्रभागांत इच्छुक अधिक आहेत. त्यामुळे पक्षनेतृत्व जो उमेदवार दिला जाईल. त्याच्या विजयासाठी झटा. उमेदवारी मिळाली नाही म्हणून दुसऱ्याला मदत करणे बाजूला सारा. कोणत्याही शिवसैनिकाकडून आता गद्दारी नको.
आमदार मिणचेकर म्हणाले, कोल्हापूरकरांच्या विश्वासामुळे सेनेने विधानसभेत दुप्पट यश मिळविले. त्यांचा विश्वास महापालिकेबाबतदेखील असून तो सार्थ ठरविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकाने झटावे.
जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या ‘लुटो, बाटो’ वृत्तीला शहरवासीय वैतागले आहेत. त्यामुळे विकासासाठी सेनेची सत्ता यावी, अशी इच्छा आहे. त्यासाठी मतभेद विसरून आम्ही एकत्र आलो आहोत. संपर्कप्रमुख दुधवडकर म्हणाले, सेनेची सत्ता असलेल्या मुंबई, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचा विकास लोकांना सांगा. टोल, पाणी आदी प्रश्नांवरील सेनेने केलेली आंदोलने, दिलेला लढा कोल्हापूरकरांपर्यंत पोहोचवा.
कार्यक्रमास शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, शहरप्रमुख शिवाजी जाधव, विजय कुलकर्णी, महिला आघाडी शहर संघटक पूजा भोर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
‘भ्रष्टाचारा’वर प्रहार...
राष्ट्रवादीच्या महापौरांचे लाचप्रकरण सर्वांनाच माहीत आहे. त्याला एकटे महापौर जबाबदार नसून राष्ट्रवादीचे नेतेसुद्धा आहेत. त्यांनी भ्रष्टाचारी कामकाज करून शहराला विकासापासून दूर नेले. त्यात काँग्रेसदेखील कमी नाही. त्यामुळे निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस-राष्ट्रवादी भ्रष्टाचार, घोटाळ्यावर सेना प्रहार करणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले.
चार मजली कार्यालय...
महापालिकेच्या इमारतीपासून हाकेच्या अंतरावर शिवसेनेने मध्यवर्ती प्रचार कार्यालय उभारले आहे. येथून इच्छुकांचे अर्ज भरून घेणे. त्यांच्या मुलाखती, कागदपत्रांची पडताळणी, प्रचार साहित्याचे वाटप, याबाबतची यंत्रणा राबविणे, सक्रिय सभासद नोंदणी केली जाणार आहे.