रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखा
By Admin | Updated: November 21, 2014 00:35 IST2014-11-20T23:24:36+5:302014-11-21T00:35:38+5:30
महापौरांचे आदेश : रस्त्यांची पाहणी; रस्त्यांचा निधी खड्ड्यात नको : नागरिकांची मागणी

रस्त्यांच्या कामाचा दर्जा राखा
कोल्हापूर : महापालिकेने शहरातील लहान-मोठ्या १५०हून अधिक रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत. १२५ कोटी रुपये खर्चून तयार करण्यात येणारे हे रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. महापौर तृप्ती माळवी यांनी आज, गुरुवारी अधिकाऱ्यांसह ‘जाऊळाचा गणपती ते रंकाळा स्टँड’ रस्त्याची पाहणी केली. अद्याप कामे सुरू न केलेल्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचनाही महापौरांनी प्रशासनास दिल्या. मागील वेळेप्रमाणे कोट्यवधीचा निधी पुन्हा खड्ड्यात घालू नका, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने घालून दिलेल्या निकषांप्रमाणे कोणत्याही प्रकारचा डांबरी रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे, असा दंडक आहे. रस्त्यांच्या डागडुजीची जबाबदारी पहिली तीन वर्षे ठेकेदारांची असते. खडीचे अयोग्य प्रमाण, रोलिंग व डांबराचा अभाव, रस्त्यांची असमान पातळी, त्यामुळे शहरातील अनेक रस्ते पहिल्या पावसातच वाहून गेले आहेत. महापालिका प्रशासन व ठेकेदारांच्या साखळीमुळेच शहर ‘डर्ट ट्रॅक’ बनले आहे.
गेल्या चार वर्षांत रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटींचा चुराडा झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. आता पुन्हा सव्वाशे कोटी रुपये खर्चून रस्त्यांची बांधणी सुरू आहे. नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागल्याने प्रशासन व नगरसेवक खडबडून जागे झाले आहेत.
दरवर्षी शहरातील गल्ली-बोळांतील रस्त्यांसाठी किमान दहा ते पंधरा कोटी रुपये खर्च केले जातात. एकात्मिक रस्ते विकास प्रकल्प, सुवर्णजयंती नगरोत्थान योजना, आमदार-खासदार फंडातून मिळालेला निधी मिळून रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी उपलब्ध होऊनही शहराला खड्ड्यांचे स्वरूप आले आहे. महापालिका प्रशासन व ठेकेदार यांच्यातील मिलिभगतमुळेच रस्त्यांची वाट लागल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर महापौरांनी रस्त्यांच्या कामाची पाहणी करून दर्जा राखण्याबाबत आदेश दिले. (प्रतिनिधी)
दर्जा राखण्याची मागणी दर्जा राखण्याची मागणी
रस्त्यासाठी व ‘पीडब्ल्यूडी’च्या निकषांनंतर कारपेट, बीबीएम किंवा हॉटमिक्स अशा कोणत्याही प्रकारे केलेला रस्ता किमान पाच वर्षे टिकलाच पाहिजे.
मात्र, शहरातील कोणताही रस्ता कसाबसा एक पावसाळा टिकतो. ‘नाबार्ड’सारख्या संस्थेकडून केलेले रस्ते पाच-पाच वर्षे टिकतात.
शहरातील रस्त्यावरच टिकाऊ पाया असतानाही रस्त्यांची चाळण का होते? याकडे मात्र सोपस्कारपणे दुर्लक्ष केले जाते.
उच्च तंत्रज्ञानाला बगल देत खडी व डांबराचे व्यस्त प्रमाण वापरून शहरातील गल्ली-बोळांत डांबर फासण्याचा पुन्हा उद्योग करू नये, अशी जोरदार मागणी नागरिकांतून होत आहे.