क्रांतीची ज्योती तेवत ठेवू
By Admin | Updated: December 21, 2015 00:26 IST2015-12-21T00:11:41+5:302015-12-21T00:26:18+5:30
‘मॉर्निंग वॉक’मध्ये निर्धार : कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या आठवणींना उजाळा

क्रांतीची ज्योती तेवत ठेवू
कोल्हापूर : ‘इसलिए राह संघर्ष की हम चलें... जिंदगी आसूओं में नहाई न हो... शाम सहमी न हो, रात हो ना डरी भोर की आँख फिर, डबडबाई ना हो...’ हे स्मृतिगीत गाऊन कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या आठवणींना रविवारी सकाळी सहभागी नागरिकांनी उजाळा दिला. निमित्त होते, ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या खऱ्या सूत्रधाराचा शोध लागावा, या मागणीसाठी शिवाजी विद्यापीठ परिसरातून काढण्यात आलेल्या ‘मॉर्निंग वॉक’चे. अण्णा, तुमचा वसा आम्ही सोडणार नाही. तुमच्या लढाईची ज्योत आम्ही अशीच अखंड तेवत ठेवू, असा निर्धार याप्रसंगी करण्यात आला.
ज्येष्ठ कामगार नेते पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर २० फेब्रुवारीला त्यांचे निधन झाले. त्या दिवसाची स्मृती कायम राहावी व मारेकऱ्यांचा शोध लागावा, या उद्देशाने दर महिन्याच्या २० तारखेला सकाळी साडेसहा वाजता पानसरे यांच्यावर जिथे हल्ला झाला, त्या ठिकाणाहून या मॉर्निंग वॉकचे आयोजन करण्यात येते.
या उपक्रमास रविवारी सकाळी सात वाजता सम्राटनगर येथून सुरुवात झाली. यामध्ये ‘सहानभूती नको, साथ हवी; प्रत्येकाच्या तोंडी निर्भयतेची बात हवी; निर्भय बना, विवेकी बना’ या आशयाची पोस्टर्सही फेरीमध्ये होती. विद्यापीठाच्या परीक्षा भवनाच्या कट्ट्यावर फिरून आल्यावर पानसरे थोडा वेळ बसत असत. त्याच ठिकाणी स्वाती कोरे, सुजाता म्हेत्तर, रसिया पडळकर, कपिल मुळे यांनी जागरगीत गायले.
याप्रसंगी आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्यांना मदत करण्याचा निर्धार सर्वांनी एकमताने केला. त्यानंतर सर्वांनी ‘कॉम्रेड गोविंद पानसरे, लाल सलाम’ असा नारा देत पुन्हा वॉक सुरू केला. सम्राटनगर येथील हुतात्मा स्मारक येथे या वॉकचा समारोप झाला.
यामध्ये ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दलितमित्र व्यंकाप्पा भोसले, दिलीप पवार, एम. बी. पडवळे, राजू राऊत, उदय नार्केकर, पांडुरंग लव्हटे, रमेश वडणगेकर, कृष्णा कोरे, नाना सावंत, रमेश हेगडे, मेघा पानसरे, निहाल शिपूरकर, तनुजा शिपूरकर, अलका देवलापूरकर, मनीषा रानमाळे, रंगराव पाटील, एस. बी. पाटील, प्रा. संजय साठे, सतीश पाटील, मल्हार पानसरे, कबीर पानसरे यांच्यासह विविध क्षेत्रांतील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. (प्रतिनिधी)