स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या गावांवर लक्ष ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:17 IST2021-07-11T04:17:54+5:302021-07-11T04:17:54+5:30

कोल्हापूर : यंदा ११० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी पूर आल्यावर नागरिकांना स्थलांतरित करावे लागते, अशा गावांवर लक्ष ...

Keep an eye on the villages that need to be relocated | स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या गावांवर लक्ष ठेवा

स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या गावांवर लक्ष ठेवा

कोल्हापूर : यंदा ११० टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आल्याने अधिकाऱ्यांनी पूर आल्यावर नागरिकांना स्थलांतरित करावे लागते, अशा गावांवर लक्ष केंद्रित करावे, बोटी सज्ज ठेवाव्यात, हेलिपॅड उभारण्यासाठी दुर्गम तालुक्यांना प्राधान्य द्यावे, जिल्ह्यात पडणाऱ्या संभाव्य पावसाचा व त्यामुळे निर्माण होणाऱ्या पूरस्थितीचा अंदाज लक्षात घेऊन प्रशासनाने सर्व आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवावी, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी शनिवारी केल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात संभाव्य पूरस्थितीसंदर्भात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. ते म्हणाले, पूरस्थितीचा फटका ज्या गावांना सर्वाधिक बसला आहे, अशा गावांची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करावी. स्थलांतरित कराव्या लागणाऱ्या गावांवर लक्ष केंद्रित करून तेथील नागरिकांची गैरसोय होणार नाही, याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, आपत्तीसाठी लागणारे मनुष्यबळ सज्ज ठेवावे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांनी पुराचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केलेल्या तयारीची माहिती दिली.

यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, कृषी अधीक्षक ज्ञानदेव वाकुरे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

----

बावडा बंधाऱ्यावर स्विस गेट

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातच झालेल्या पंचगंगा प्रदूषण आढावा बैठकीत प्रदूषण रोखण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर बावडा बंधाऱ्यावर स्विस गेट बसवण्याचा निर्णय झाला. यामुळे बंधाऱ्याच्या तळाला असलेली घाण निघून जाण्यास मदत होईल, तसेच पंचगंगेचे प्रदूषण आटोक्यात आणण्याबाबत प्रशासनाने डीपीआर तयार करावा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. तसेच पूर नियंत्रणासाठी राधानगरी धरणाच्या सर्व्हिस गेटचे अत्याधुनिकीकरण करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही ते म्हणाले.

--

फोटो नं १००७२०२१-कोल-पूर आढावा बैठक

ओळ : कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारी पालकमंत्री सतेज पाटील यांनी संभाव्य पूरस्थितीसंदर्भात आढावा बैठक घेतली.

---

Web Title: Keep an eye on the villages that need to be relocated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.